टीम मंगळवेढा टाईम्स ।
विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण घेता येत नसल्याने ते समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतात.
त्यांचे शैक्षणिक मागासलेपण दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या संस्थामार्फत निवासी आश्रम शाळा चालवल्या जातात. अशा आश्रम शाळांना शासनाकडून अनुदान दिले जाते.
परंतु संस्थांकडून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवल्या जात नाहीत, हे तपासणीअंती स्पष्ट झाल्याने व शासनाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ५ संस्थांच्या २० शाळेवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने प्रशासक नेमला आहे.
यात साईबाबा तरुण मंडळ अक्कलकोट संचलित प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा व उच्च माध्यमिक आश्रम शाळा नागणहळ्ळी ता.अक्कलकोट,
शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक आश्रम शाळा, उच्च माध्यमिक आश्रम शाळा यड्राव ता. मंगळवेढा तसेच प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा पडोळकरवाडी,
नाईक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद संचलित प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा, उच्च माध्यमिक आश्रम शाळा तांबेवाडी ता. बार्शी,
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड ता. माढा संचलित प्राथमिक आश्रम शाळा, उच्च माध्यमिक आश्रम शाळा केवड ता. माढा मागास सेवा मंडळ नेहरूनगर संचलित प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा, नेहरूनगर प्राथमिक आश्रम शाळा,
माध्यमिक आश्रम शाळा मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा जामगाव बुद्रुक ता.मोहोळ अशा ५ संस्थेतील २० आश्रम शाळेवर राज्य शासनाने प्रशासक नेमला आहे.
निवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात चांगले शिक्षण देणे हा शासनाचा मुख्य हेतू आहे. त्यानुसार आश्रम शाळेमध्ये आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवणे ही संबंधित संस्थांची जबाबदारी आहे.
परंतु बऱ्याच वेळा या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे दिसते.(स्रोत:पुण्यनगरी)
सहायक आयुक्त प्रशासकपदी
आश्रम शाळा संहितेनुसार ज्या आश्रम शाळा शासनाने विहित केलेल्या ध्येय धोरणानुसार चालवल्या जात नाहीत, त्या आश्रम शाळेवर आश्रम शाळा संहिता प्रकरण ३ मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येते.
आता सदर आश्रम शाळेवर समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
व प्रशासक यांनी तातडीने पदभार घेऊन कार्यवाही अहवाल तात्काळ पाठवण्याचे आदेश उपसचिव कैलास साळुंके यांच्याच पत्राने देण्यात आले आहेत.
इतर आश्रम शाळेतही खळबळ
सोलापूर जिल्ह्यात आश्रम शाळेचा कारभार पारदर्शक आहे असे नाही. सध्या काही जात्यात आहेत तर काही सुपात आहेत. त्यामुळे येत्या काळात सुद्धा ज्या आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या निधीवर डल्ला मारून कोट्यधीश झाले, तशा संस्थाचालकांनाही आता चाप बसणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज