टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना 25 वर्षांसाठी बारामती ऍग्रोला चालवण्यास देण्याचा निर्णय कारखान्याच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
ही वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. उपस्थित 612 सभासदांपैकी 98 टक्के सभासदांनी कारखाना बारामती ऍग्रोला 25 वर्षे चालवण्यास देण्याच्या बाजूने मतदान केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी सांगितले, की या सर्वसाधारण सभेमध्ये श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना 25 वर्षांसाठी भाडेपट्टा करार देण्याच्या शिखर बॅंकेच्या ठरावाला 98 टक्के सभासदांनी मतदान केल्यामुळे हा कारखाना अधिकृतरीत्या बारामती ऍग्रोकडे जाण्याचा अडथळा आता संपला आहे.
सभेत सभासद, वाहतूकदार, कर्मचारी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत.या सर्वसाधारण सभेवेळी कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी ठरावाचे वाचन व प्रश्नाचे वाचन केले तर कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी आभार व्यक्त केले.
या सभेला कारखान्याचे मार्गदर्शक संचालिका रश्मी बागल, नानासाहेब लोकरे, पांडुरंग जाधव, प्रकाश पाटील, अविनाश वळेकर, नामदेव भोगे, मंदा लक्ष्मण गोडगे, भामाबाई दिलीप केकाण, सचिन पांढरे, आशीष गायकवाड, स्मिता पवार आदी उपस्थित होते.
आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्यावरून गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती. कारखाना नेमका 15 की 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर द्यायचा? यावरून संचालक मंडळातही वाद होता. मात्र, ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत 25 वर्षांसाठी कारखाना देण्याचा निर्णय झाला आहे.
कारखान्याची पुढील कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाणार आहे. तर आदिनाथ कारखाना बारामती ऍग्रोला देण्यासाठी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा मॅनेज केली असल्याचा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष रमेश कांबळे यांनी केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज