राजेंद्र फुगारे । पंढरपूर
विठ्ठल कारखान्याच्या २५ हजार ३९२ सभासदांनी मला निवडून दिले. कारखाना सुरू होण्यापूर्वी सभासदांचे पैसे तर देऊच, त्याचबरोबर विठ्ठलाच्या पहिल्या हंगामात २,५०० रुपये भाव देऊ, असे कारखान्याचे नूतन चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाच्या निवडीसाठी घेण्यात आलेली संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थित गुरुवारी कारखान्यावर पार पडली.
यावेळी चेअरमनपदी अभिजित पाटील व व्हाईस चेअरमनपदी प्रेमलता रोंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यानंतर अभिजित पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे अभिजित पाटील म्हणाले , गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला विठ्ठल साखर कारखाना १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
किमान १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गाळप हंगामापूर्वी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, ऊस वाहतूक ठेकेदारांची थकीत देणी देणार आहे.
जोपर्यंत उसाचे बिल देत नाही तोपर्यंत गावात सत्कार स्वीकारणार नसल्याचे नुतन चेअरमन अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले.
महिला सभासदांसाठी योजना राबविणार
कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रेमलता रोंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या ४५ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहिला उपाध्यक्ष मान मिळाला.
महिला सभासदांसाठी विशेष योजना राबविली जाईल, महिला म्हणून कारखान्याचा कारभार सचोटीने करणार असल्याचे नूतन उपाध्यक्षा प्रेमलता रोंगे यांनी सांगितले.
कुणालाही जाणूनबुजून त्रास होणार नाही , सूडबुद्धीने कारवाई नाही : अभिजित पाटील
कारखान्याचा अहवाल नंबर ४४ वर ४५ नुसार १० ९ कोटी रुपये थकीत येणे बाकी आहे . थकबाकीदारांना १३८ ची नोटीस देण्यात येत आहे . त्यांच्याकडून ती रक्कम व्याजासकट वसूल करण्यासाठी प्रयत्न राहणार आहे . विजय शुगरकडे अंदाजे ५.५ कोटी रुपये थकीत आहेत . ज्यांनी कारखाना घेतला त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहेत . थकबाकीदारांवर कारवाई सुरू असताना , कुणालाही जाणूनबुजून त्रास होणार नाही . तसेच सूडबुद्दीने कारवाई होणार नसल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले .
शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न
मागील आठ वर्षापासून शेतकयांच्या प्रश्नांसाठी लढत होतो . त्याचे फळ आता आम्हाला मिळाले आहे . कारखान्याचा कारभार योग्यरीत्या चालवून शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करणार आहे – डॉ . बी . पी . रोंगे प्राचार्य , स्वेरी कॉलेज
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज