मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग ।
विश्वासार्हतेवर चालणाऱ्या पतसंस्थेमध्येच एका जबाबदार अधिकाऱ्याने हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार सांगोला शहरात समोर आला आहे.

‘श्री बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थे’च्या सचिवाने तब्बल ४० खातेदारांचे तारण ठेवलेले सोने बँकेच्या लॉकरमधून परस्पर काढून त्याची विक्री केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी ८७ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सचिवासह गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी रमेश विठ्ठल रणदिवे (रा. सांगोला) हा गेल्या ३० वर्षांपासून या पतसंस्थेत सचिव म्हणून कार्यरत होता. पतसंस्थेचे सोने तारण कर्ज घेतलेल्या ग्राहकांचे दागिने सुरक्षेसाठी पंढरपूर अर्बन बँकेच्या सांगोला शाखेतील लॉकरमध्ये ठेवले जात असत. संस्थेच्या एकूण ४४ सोने तारण कर्ज खातेदारांचे सोने या लॉकरमध्ये होते.

असा झाला घोटाळा
सचिव रमेश रणदिवे याने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. त्याने लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांपैकी तब्बल ७३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोणत्याही परवानगीशिवाय चोरून नेले.

त्यानंतर त्याची परस्पर विल्हेवाट लावून संस्थेची ८७ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच संस्थेचे प्रमुख अमर कृष्णात लोखंडे यांनी पोलिसांत धाव घेतली.

३० वर्षांचा विश्वास धुळीस
गेल्या तीन दशकांपासून संस्थेत कार्यरत असलेल्या आणि अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या सचिवानेच हा मोठा डल्ला मारल्याने सांगोला परिसरात एकच चर्चा रंगली आहे.
ग्राहकांचे सोने सुरक्षित नसल्याचे समोर आल्याने पतसंस्थेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अमर लोखंडे यांच्या फिर्यादीवरून सांगोला पोलिसांनी रमेश रणदिवे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












