टीम मंगळवेढा टाईम्स ।
पेट्रोल पंप चालविणा-या सोलापुरातील एका डॉक्टरचे अपहरण करून एक कोटीची खंडणी मागितली आणि पुण्यात नेऊन त्याच्याकडून ५ लाख ८८ हजारांची रोकड लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला अटक करण्यात सोलापूर ग्रामीणच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.
डॉ. अनिल व्यंकटेश कुलकर्णी (वय ४७, रा. ५६५, उत्तर कसबा, सोलापूर) यांचा वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे छोटा दवाखाना आणि इंडियन आॕईल कंपनीचा पेट्रोल पंपही आहे.
दि.२१ सप्टेंबर रोजी रात्री डॉ. कुलकर्णी हे पेट्रोल पंप व दवाखान्यात जमा झालेली ५ लाख ८८ हजारांची रोकड घेऊन स्वतःच्या मोटारीने सोलापूरकडे परत येत होते.
त्यावेळी वाटेत इनोव्हा मोटार पाठीमागून आली आणि डॉ. कुलकर्णी यांच्या मोटारीपुढे आडवी थांबली.
इनोव्हामधून उतरलेल्या सात दरोडेखोरांनी गावठी बंदुकीचा धाक दाखवून डॉ. कुलकर्णी यांना पकडून त्यांचे इनोव्हा गाडीतून अपहरण केले. त्यांना कोयता, काठी, हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली.
मोहोळ, टेंभुर्णी, इंदापूर, बारामती, सासवडमार्गे पुण्यातील वारजे-माळवाडी येथील उड्डाण पुलावर नेल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांना एक कोटीची खंडणी मागत त्यांच्या जवळील ५ लाख ८८ हजारांची रोकड लुटून त्यांना गाडीतून ढकलून दिले होते.
या गुन्ह्याची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाल्यानंतर जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरविली.
वारजे-माळवाडीत डॉ. कुलकर्णी यांना दरोडेखोरांनी सोडून दिले, याचा अर्थ त्यापैकी काही दरोडेखोर त्याच परिसरात राहणारे असावेत, या दृष्टिकोनातून तपास केला असता धागेदोरे हाती लागले.
चौघे संशयित दरोडेखोर पुण्यात राहणारे असून दोघे वडाळा (उत्तर सोलापूर) गावचे राहणारे आहेत. विकास सुभाष बनसोडे (वय ३१), सिध्दार्थ उत्तम सोनवणे (वय ४२, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे), रामचंद्र बालाजी कांबळे (वय २८, रा. न-हे, ता. हवेली, पुणे), वैभव प्रवीण कांबळे (वय २१, रा. जवळा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), भारत दत्तात्रेय गायकवाड (वय ३१) आणि मुराद हनीफ शेख (वय ३१, रा. वडाळा, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.
यातील तिघेजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सशस्त्र दरोडे, अपहरण, खून आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर दोघेजण सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगून आले आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, समीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई करताना या टोळीकडून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडीसह दुचाकी, लुटीतील अडीच लाखांची रोकड आणि आठ मोबाइल संच आदी ऐवज हस्तगत केला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज