मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सोलापूर शहरातील प्रसिद्ध न्यूरो फिजीशियन डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागलंय. आत्महत्येआधी वळसंगकरांनी एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात आत्महत्येला जबाबदार एका महिला अधिकाऱ्याचा उल्लेख होता.
पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. पण ती महिला नेमकी कोण? तिने डॉ. वळसंगकरांवर कोणते आरोप केले होते?
सोलापुरातले प्रसिद्ध न्यूरो फिजीशियन असलेल्या डॉ. वळसंगकरांनी 18 एप्रिलच्या रात्री आत्महत्या केली आणि अख्खं सोलापूर हादरलं. पण वळसंगकरांनी आत्महत्या का केली? याचं कोडं दोन दिवसांनी उलगडलं. 69 वर्षांचे डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात त्यांनीच लिहिलेली एक सुसाईड नोट समोर आली.
यात डॉक्टरांनी रुग्णालयातील एका महिला प्रशासकीय अधिकाऱ्याला जबाबदार धरलं. त्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून झालेल्या आरोपांमुळेच आपलं जीवन संपवत असल्याचं डॉ.वळसंगकरांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.
डॉ.वळसंगकरांनी ज्या अधिकाऱ्याचा उल्लेख केला ती एक महिला आहे. 2008 पासून ही महिला अधिकारी वळसंगकरांच्या हॉस्पिटलमध्ये कामाला होती. वळसंगकरांच्या सुसाईड नोटवर त्यांचा मुलगा डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर मनिषा माने या महिलेला अटक करण्यात आली.
डॉ. वळसंगकरांच्या सुसाईट नोटमध्ये काय?
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात डॉ. वळसंगकरांचे एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर आरोप, ज्याला शिकवून मोठं केलं, चांगला पगार दिला त्याच्याकडूनच घाणेरडे आरोप, धमकी आल्याचं सांगितलं. याचंच दुःख झाल्यानं डॉ. वळसंगकरांनी घेतला टोकाचा निर्णय.
मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने डॉ. वळसंगकरांवर घाणेरडे आरोप करत त्यांना आत्महत्येची धमकी दिली होती. तेव्हापासून डॉ. वळसंगकर तणावात होते.
शुक्रवार 18 एप्रिलच्या रात्री 8 वाजता डॉ.वळसंगकर हॉस्पिटलमधून घरी परतले आणि साडेआठ वाजता त्यांच्या बेडरुममधून बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज आला. कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. त्यावेळी डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. डॉक्टर असलेल्या त्यांच्या मुलानं आणि सुनेनं वळसंगकरांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण साडेदहा वाजता त्यांनी प्राण सोडला.
डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येस कारण ठरलेल्या संशयित महिलेच्या वकिलांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, माझ्या आशिलाद्वारे मला हीच माहिती मिळाली आहे की मी फक्त मेल केला आहे बाकी कुठेही आर्थिक व्यवहार किंवा डॉक्टरांच्या चारित्र्यावर आरोप केलेले नाहीत.
संशयित महिलेला आता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 17 एप्रिलला तिनं डॉक्टरांवर केलेल्या आरोपांच्या ईमेलची प्रतही जप्त करण्यात आली. या प्रकरणात पोलिस कसून तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज