टीम मंगळवेढा टाईम्स।
मोहोळ तालुक्यातील ‘अनगर’चे पाटील व ‘नरखेड’चे पाटील यांच्यामध्ये ‘पाटीलकी’ वरून चांगलेच शीतयुध्द तापले आहे.
यातच भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या रणांगणात खा.धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवारासोबत ‘राष्ट्रवादी’चे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आयतीच संधी साधत राजन पाटील व त्यांच्या मुलांवर टीकांच्या बाणाचे वर्षाव केले.
सध्या दोन्हीकडून एकमेकांवर शाब्दिक फायरिंग चालू आहे. मात्र शेवटच्या सभेतील पाटलांची भाषणं ऐकल्यावर आपसूकच सभासद आणि जनता विचारत आहेत की, कसं काय पाटील बरं हाय का .. ? काल काय ऐकलेलं खरं हाय का … ?
“पाटील म्हणजे गावची शान. गावचा अभिमान. लग्न, साखरपुडा, बारसं या घरगुती कार्यक्रमासह गावच्या तालुक्याच्या राज्याच्या राजकीय पटलावर देखील पाटलाचा सन्मान असतो.
मात्र अनगरच्या पाटलांनी मोहोळ तालुक्याची अब्रू वेशीवर टांगली. पाटील हे नाव सांगायची लाज वाटू लागलीय, असा घणाघात ‘नरखेड’च्या पाटलांनी केला.
सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या भीमा कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या एन्ट्रीने चांगलाच रंग भरला होता.
भीमा कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित एका सभेत बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक हे मुलाला लॉन्च करत आहेत.
त्याला यातील काय कळते ? अशी टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना खासदार धनंजय महाडीक म्हणाले होते, तुमच्या मुलांसारखी माझी मुलं वाया गेलेली नाहीत.
माझ्या मुलावर मी चांगले संस्कार केले आहेत. तुमच्या मुलाप्रमाणे चपलेने मार खाल्ला नाही. माजी आमदार राजन पाटील आणि खासदार धनंजय महाडीक यांच्या या वक्तव्याबाबत वाड्यावस्त्यांवरील गप्पांमधून खमंग चर्चा सुरु आहे.
दरम्यान, माजी आमदार राजन पाटील ‘भीमा’च्या निवडणुकीच्या शेवटच्या सभेत बोलताना ‘आमच्या पोरांना बाळ म्हणत्याती… आरं आम्ही पाटील हाव …. यांना माहीतच नाय, पाटलांच्या पोरांना लग्नाआधी बेट्या तुझ्याएवढी बाळ असत्यात. आणि याचा आम्हाला अभिमान आहे.
आमच्या पोराला भीती घालतोय. आरं आमची पोरं वयाच्या १७ वर्षी ३०२ मध्ये जाऊन आल्याती असे म्हणत जणू तोंडपाटील की केली.
या वक्तव्यावर ‘नरखेड’चे उमेश पाटील यांनी खरपूस समाचार घेताना आता ‘पाटील’ हे नाव सांगायला राज्यात मला लाज वाटेल, असे उपरोधिक विधान केले.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज