मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या गरीब गरजूंना मदत व्हावी या उद्देशाने मरवडे येथील नागरिकांना किराणा वस्तूंच्या पॅकेजचे वाटप करण्यात आले. अशा सामाजिक उपक्रमांचा आदर्श अन्य गावांनी घ्या वा असे आवाहन तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले.
मरवडे गावातील हातावरचं पोट असलेल्या गरीब गरजू कुटुंबाना आर्थिक अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी किराणा वस्तूंचे वाटप करण्याचा संकल्प छत्रपती परिवाराच्या वतीने करण्यात आला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील नोकरदार मंडळी तसेच अन्य दानशूर व्यक्तींनी जवळपास दोन लाख रुपये मदतनिधी उभा केला. त्यातून जीवनावश्यक सतरा वस्तूंचे पॅकेज गावातील 250 कुटुंबाना वाटपास आरंभ करण्यात आला.
याशिवाय गावातील राजमाता प्रतिष्ठानच्यावतीने एक महिन्यांचे धान्य दळण मोफत करुन देण्यासाठी कुपनचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार , सरपंच महादेव मासाळ, राजमाता प्रतिष्ठानचे हणमंतराव दुधाळ, उपसरपंच विजय पवार इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या उपक्रमाच्या अनुषंगाने माहिती सुरेश पवार यांनी दिली व गावातील दानशूर मंडळीनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. पहिल्याच दिवशी शंभर कुटुंबियांना ही मदत पोहोचवण्यात आली.येत्या दोन दिवसांत सर्व लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. यावेळी मंडल अधिकारी घाडगे, पोलिस पाटील महेश पवार, तलाठी वाघमोडे, मेजर रमेश शिंदे,अंबादास पवार ,हणमंत शिवशरण राजू भंडगे यांच्यासह मरवडे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज