टीम मंगळवेढा टाईम्स । चोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी झाडाला टांगून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर शहराजवळ कुंभारी येथे हा अमानूष प्रकार घडला.
याप्रकरणी गेनसिध्द सिध्दप्पा माळी, आण्णाराव सोमलिंग पाटील, योगेश भीमशा पुजारी आणि बाबुशा सोमलिंग पाटील (रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस हवालदार म्हाळप्पा सुरवसे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार कुंभारी गावच्या शिवारात आण्णाराव सोमलिंग पाटील यांच्या शेतातील वस्तीवर हा प्रकार घडला. पाटील यांच्या शेतात शेळीमेंढी पालन केंद्र आहे. तेथे मध्यरात्रीनंतर ३० ते ३५ वर्षांचा एक अनोळखी तरूण आला.
तेव्हा तेथील कुत्रे भुंकू लागल्याने पाटील कुटुंबीय आणि अन्य गावकऱ्यांनी संबंधित तरुणाला पकडले. त्यांनी त्याला चोर समजून झाडाला उलटे टांगून काठय़ांनी बेदम मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने हा तरूण बेशुद्ध पडला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच येथील वळसंग पोलीस ठाण्यातील पोलीस आले.
यावेळी हा तरूण बेशुद्ध अवस्थेतच झाडाला लटकलेला आढळून आला. त्याला तातडीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच मृत
ग्रामीण पोलीस कंट्रोलवरून वळसंग पोलिसांना निरोप आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. तेव्हा ‘तो’ तरुण झाडाला बांधलेल्या अवस्थेत उलटे लटकताना आढळला. त्याला पोलिसांनी उपस्थितांच्या मदतीने खाली उतरवून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पण उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनाच्या वेळी त्या तरुणाच्या शरीरावर मोठ्या जखमा दिसून आल्या. त्याच्या शरीरातील अनेक भागाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले.
‘मैं पूने से आया हूं, मेरे साथ तीन लोग हैं’
आरोपींनी संशयित चोराला पकडल्यानंतर त्याला विचारणा केली असता त्या तरुणाने ‘मैं पूने से आया हूं, मेरे साथ तीन लोग हैं, वो सब भाग गये’, असे तो संशयित चोर म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांची शोधमोहीम
मयत तरुण हा आपल्यासोबत तीन साथीदार आहेत असे सांगत होता, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे, पण त्याच्यासोबत त्याचे साथीदार होते की नाही याचा तपास पोलीस करत आहेत.
त्यावेळी आरोपींनी त्या तरुणास मारण्यासाठी काठ्या, लाकडे असे जे साहित्य वापरले ते पोलिसांनी जप्त केले आहे. संबंधित प्रकार नेमका काय आहे यासाठी वळसंग पोलिसांनी शोधमोहीम जारी ठेवली आहे. दरम्यान अटक केलेल्या चौघांच्या जाबजबाबातून आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Solapur Murder by beating an unidentified youth on suspicion of theft
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज