सोलापूर । मुळात सोलापूर म्हटल्यावर आयएएस व आयपीएस अधिकारी नाक मुरडतात. आतापर्यंत जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांचे पदे रिक्त ठेऊन कसेबसे कामकाज सुरू होते. मात्र ,आता चक्क जिल्ह्याला पोलीस अधिक्षकच मिळेना झाला. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या बदलीला आता १४ दिवस होऊन गेले. त्यांच्या जागेवर अद्यापही नवीन पोलीस अधिक्षक आले नाहीत.
सध्या प्रमुखाविनाच ग्रामीण पोलीसांचा कारभार सुरु आहे.त्यामुळे महाविकास आघाडीचा कारभार किती अजबपणे सुरु आहे. हेच अधोरेखित होत आहे.
जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त,महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिक्षक या चार प्रमुख अधिकाऱ्यांच्या खांद्यावर शहर व जिल्ह्याची धुरा आहे. सध्या कोरोनाच्या काळात चार प्रमुख अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे.
तेवढ्यात पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगरला बदली झाली.त्यांच्या जागेवर लगेच दुसऱ्या कोणाची तरी नियुक्ती होईल ,असे वाटत होते. मात्र, गेल्या १४ दिवसापासून चक्क पोलीस अधिक्षक पद रिक्त ठेऊन ग्रामीण पोलीसांचा कारभार कसाबसा सुरु आहे.
अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्याच खांद्यावर पोलीस अधिक्षक पदाचा अतिरिक्त भार टाकून ‘प्रभारी’ वर ग्रामीण पोलीसांचा गाडा हाकला जात आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात खून, मारामारी, लुटमारीच्या घटना वारंवार घडत आहे.
जिल्ह्यात अवैध व्यवसाय जोमात सुरु झाले आहेत. बेकायदेशीर वाळू उपसा राजरोसपणे सुरु आहे. जुगार अड्डे तोंड वर काढत आहेत. अवैध दारु विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशा परिस्थितीत प्रमुख अधिकारीच नसतील तर निर्णय कोण घेणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रशासनातील अनेक पदे रिक्त आहेत. मात्र , आता प्रमुख पदच रिक्त ठेऊन महाविकास आघाडीच्या सरकारने सोलापूरकडे साफ दुर्लक्ष करुन टाकले आहे. पोलीस अधिक्षकांविना जिल्ह्याचा कारभार आणखी किती दिवस चालू राहणार , असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष
पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेच सोलापूरला अधून मधून येतात. इंदापूरमध्ये बसून ते जिल्ह्याचा कारभार पाहतात.त्यामुळे जिल्ह्याच्या प्रत्येक घटनांकडे लक्ष ठेवणे त्यांना अशक्यच आहे.
जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एकपद १४ दिवसापासून रिक्त आहे.तरीही काहीच हालचाली होताना दिसून येत नाही. यावरून पालकमंत्र्यांचे सोलापूरवर किती लक्ष आहे. याचा अंदाजच न केलेला बरा असे म्हणावे लागेल.
मर्जीतील अधिकारी मिळेना ?
सत्ताधाऱ्यांना आपल्याच मर्जीतील अधिकारी हवा असतो. त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. सत्ता बदल्यावर पटापट अधिकारीही बदलतात. हे आताच्या बदल्यावरुन दिसून आले. पालकमंत्री, सत्तेतील इतर आमदार व नेत्यांच्या मर्जीतीलच पोलीस अधिक्षक हवा असणार आहे.
तसा मर्जीतील अधिकारी अद्याप सापडलेला नसावा आणि सापडला तरी तो अधिकारी सोलापूरला येण्यास तयार नसावा, असाच अंदाज सध्या तरी काढला जात आहे. (सोलापूर/विठ्ठल खेळगी पुण्यनगरी)
Strange work of Mahavikas Aghadi! 14 days later, Solapur district did not get a Superintendent of Police
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज