मंगळवेढा टाईम्स न्युज।
पोस्टमन म्हणजे गावाचा विश्वास. टपालापासून, आधार कार्ड, पेन्शनची कागदपत्रे, बँकेची पत्रे घरी पोहोचवणारा हक्काचा माणूस.
पण यवतमाळच्या पांढरकवडा येथे हाच विश्वास अक्षरशः तीन पोत्यांत कोंबून घरातच लपवून ठेवला असल्याचं समोर आलं. पोस्टमनने लोकांची पत्रं पोहोचवलीच नाहीत. टपाल खात्याचा आणि माणुसकीचा विश्वास… सगळंच पोत्यामध्येच अडकून राहिलं.

काही महिन्यांपासून ‘पोस्ट मिळाली नाही’ अशी कुजबुज सुरू होती. शेवटी तपास झाला… आणि पोस्टमनच्या घरातून आधार कार्ड, वृद्धांचे पेन्शन पेपर्स, व्यापाऱ्यांचे धनादेश, LIC पॉलिसी, ATMCredit Card, महत्त्वाची कायदेशीर कागदपत्रे अशी टपाल साहित्याने भरलेली तीन पोती जप्त झाली. सतीश धुर्वे असं या पोस्टमनचं नाव असून, पोस्ट विभागाकडून चौकशी सुरू आहे.

तक्रारीनंतर उघडकीस आलं टपालाचं रहस्य
पांढरकवडा येथील HDFC बँकेचे मनीष प्रधान आणि अॅड. गाजी इबादुल्ला खान यांनी पोस्ट ऑफिसमधून कागदपत्रे मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पार्सल न मिळाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. शेवटी पोस्ट विभागाने तपास करत थेट पोस्टमनच्या घराची झडती घेतली आणि अक्षरशः पार्सलचं घबाड समोर आलं.

नोकरीची पत्रे, पेन्शन, धनादेश अडकले
या प्रकारामुळे अनेक युवकांची नोकरीची कॉल लेटर्स, वृद्धांचे पेन्शन पेपर्स, व्यापाऱ्यांचे धनादेश अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचं स्पष्ट होत आहे.

कारवाईची मागणी, चौकशीचे आदेश
तक्रारदारांनी पोस्टमन सतीश धुर्वे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि पोस्ट ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोस्ट विभागाने या प्रकारावर कारवाई सुरू केली असली, तरी या घटनेमुळे टपाल व्यवस्थेवरील विश्वासाला मोठा तडा गेला आहे.

पोस्टमन म्हणजे ‘सरकारी विश्वासाचा हात’. पण तोच हात जर पत्रं पोहोचवण्याऐवजी ती घरात साठवू लागला, तर सामान्य माणसाने विश्वास ठेवायचा तरी कुणावर? तीन पोती टपाल सापडली… पण त्यात अडकलेल्या लोकांच्या महिन्यांच्या चिंता, पाहिलेली स्वप्नं आणि त्यांचे नुकसान कोण भरून काढणार असा सवाल आता विचारला जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












