मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज संपत असून शहरात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारखे मुद्दे मागे पडत यंदा प्रचारापेक्षा पैशांचीच चर्चा अधिक गाजताना दिसत आहे.
प्रभागातील एक-एक मत आपल्या पारड्यात पाडण्यासाठी इथल्या राजकीय इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू असल्याची उघड चर्चा रंगली आहे. मात्र या निवडणुकीत मतदार राजाच ‘किंगमेकर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

ऐन मंदीच्या काळात या आर्थिक चढाओढीमुळे तब्बल ९० टक्के मतदारांची यंदा ‘दिवाळी साजरी होणार’, अशीच स्थिती मंगळवेढा शहरात दिसून येत आहे.

एका मतासाठी ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत ‘सन्मान निधी’ देण्याची तयारी उमेदवारांनी केल्याची जोरदार चर्चा आहे.

सर्वच प्रभागांमध्ये दोन्ही बाजूंनी निधी मिळाल्याने मतदार नेमके मताचे दान कुणाच्या पारड्यात टाकणार, याचे टेन्शन उमेदवारांना सतावत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा एक हजार रुपये जास्त देण्याची रणनीती काही थैलीबाज उमेदवारांनी आखल्याचेही बोलले जात आहे.

‘पैशापेक्षा प्रतिष्ठा मोठी’ या मानसिकतेतून आर्थिक सौदेबाजी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मतदारांवर पकड ठेवण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जात असल्याचे चित्र आहे.
मतदार ‘किंगमेकर’ बनल्याने त्यांची ताकद वाढली असली, तरी याचा परिणाम लोकशाही मूल्यांवर होत असल्याची चिंता व्यक्त होत आहेत.

निवडणूक म्हणजे विकासासाठीची स्पर्धा की पैशांचा खेळ, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती जाणार आणि मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष कोण होणार, याबाबत गल्ली गल्लीत नाक्यानाक्यांवर चर्चा रंगली आहे. मतदार मतपेटीत नेमका कुणाचा कौल टाकणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












