मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली असून मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्यानंतर काही काळ शांत झालेली निवडणूक आता पुन्हा उसळी मारून वेग घेऊ लागली आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून, संघर्ष वैचारिक मर्यादा ओलांडून वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे.

तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचार प्रमुखांकडून भाजप उमेदवार सुप्रिया जगताप यांचे पती अजित जगताप यांच्यावर तीव्र टीका सुरू आहे. तर दुसरीकडे युवक नेते सिद्धेश्वर आवताडे आणि अजित जगताप यांच्यातील वाक्युद्धामुळे प्रचार अधिक आक्रमक बनला आहे.

या राजकीय संघर्षाला ठिणगी पडली ती कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी उद्योग संघातील गाळ्यांच्या डिपॉझिट व भाडे व्यवहारांवरून, या व्यवहारांमध्ये अनधिकृत रक्कम घेतल्याचा गंभीर आरोप अजित जगताप यांनी केला.

त्याला प्रत्युत्तर देताना सिद्धेश्वर अवताडे यांनी, ‘सुनंदा आवताडे नगराध्यक्ष झाल्यावर सर्व कारभार त्या स्वतः पाहतील. मी किंवा माझे वडील हस्तक्षेप करणार नाहीत. हे आम्ही पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यास तयार आहोत’, असे खुले आव्हान दिले.

यावर जगताप यांनीही प्रतिआव्हान देत, ‘जर १० तारखेपर्यंत बाजार समिती, कृषी उद्योग संघ तसेच शहरातील नागरिकांकडून घेतलेल्या अनधिकृत रकमा परत करण्यात आल्या, तर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेऊ’, असा दावा केला. ‘स्टॅम्प पेपरची भाषा म्हणजे विरोधकांच्या घबराटीचे लक्षण आहे’, असा टोला त्यांनी लगावला.

बाजार समितीवर झालेल्या आरोपावर सभापती सुशील आवताडे यांनी सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत केलेली असून रीतसर कागदपत्रे असल्याचे त्यांनी सांगितले.
तर आचारसंहिता लागू असताना गटारीचे कामकाज सुरू असल्याचा आरोप प्रकाश खंदारे यांनी केला आहे, यावर काय उत्तर येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीका करताना पातळी ओलांडली असून गंभीर मुद्दे उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ही निवडणूक आता झंझावाती व स्फोटक टप्प्यात पोहोचली असून, अखेर नगराध्यक्ष पदाची खुर्ची कुणाच्या ताब्यात जाणार, याकडे संपूर्ण मंगळवेढ्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सर्व उमेदवारांनी पॅनल प्रमुखांनी टीका करताना मर्यादा पाळावी असे आवाहन सुज्ञ नागरिक करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












