मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सहा महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचे आठवडाभरात मंत्रिमंडळात पुनरागमन होऊ घातले असून, त्यासाठी राष्ट्रवादीचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांना मात्र पायउतार व्हावे लागेल, असे खात्रीलायक वृत्त आहे.
मागील सहा महिन्यांपासून मुंडे मंत्रिमंडळात नाहीत. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे, असा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड गजाआड झाला.
या हत्याकांडात वाल्मीक याच्या साथीदारांवर ‘मोका’ लागला. मात्र, वाल्मीक याच्यावर हे कलम अद्याप लावले गेलेले नाही. त्याचा तपास सुरू असतानाच धनंजय मुंडे यांना याच प्रकरणात राजीनामा द्यावा लागला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून तत्कालीन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला होता.
सरपंच हत्याकांड व अन्य प्रकरणांची चौकशी मागे लागल्याने मुंडे इतक्यात मंत्रिमंडळात परत येत नाहीत, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागताच मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची हीच संधी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओळखले, असे कळते.
राज्यात जानेवारी 2026 अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणुकांतच 2029 च्या विधानसभा निवडणुकांचे मैदान आखले जाणार असल्याने धनंजय मुंडे यांच्यासारख्या चेहर्याला मंत्रिपदापासून दूर ठेवणे राष्ट्रवादीला परवडणारे नाही, असा विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बळावला.
त्यामुळे मुंडे यांच्यावर आठवडाभरात मंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. मंत्रिमंडळातील त्यांचा प्रवेश सुलभ व्हावा, यासाठी पक्षाचे मंत्री झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार असून, त्यांना पक्षाचे मोठे पद दिले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री बदल करणार असल्यामुळे या फेरबदलात किमान तीन खात्यांमध्ये फेरबदल करण्याचा विचार भाजपकडूनही सुरू असून, किमान तीन मंत्री वगळून त्यांच्या जागी नवे चेहरे आणण्याचे भाजपमध्ये घाटत असल्याचे समजते.
तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद
मागच्या सरकारमध्ये वादग्रस्त ठरलेले माजी मंत्री तानाजी सावंतदेखील मंत्रिमंडळात दाखल होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी सावंत यांच्यावर होती.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भूम-परांडा मतदारसंघातून ते विजयी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने वर्षभरापासून सावंत नाराज आहेत. आता त्यांची नाराजी दूर होण्याची शक्यता असून, त्यांच्यासाठी भरत गोगावले यांचे मंत्रिपद रिकामे केले जाण्याची होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकाला संधी मिळणार
सोलापूर जिल्ह्यातील एका आमदारांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्यानशेट्टी, मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आ.विजयकुमार देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू असून यापैकी कुणाला संधी मिळणार आहे हे चार पाच दिवसात स्पष्ट होईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज