मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणाला आज दुसरा दिवस आहे. कालपासून मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले असतानाही मराठा आंदोलकांचा उत्साह आणि निश्चय अजिबात ढळलेला नाही.
“दोन दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर पाणीत्याग करू,” असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, आंदोलकांनी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनवर मुक्काम ठोकला, जिथे त्यांनी “एक मराठा, लाख मराठा”च्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले.
मराठा आंदोलकांचा निर्धार: आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही
मुंबईत काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. तरीही आझाद मैदानात हजारो मराठा आंदोलकांनी जमाव केला आहे. आझाद मैदानाजवळ राहण्याची सोय नसल्याने अनेक आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशनवर रात्री विश्रांती घेतली. स्टेशनच्या फलाटांपासून ते तिकीट घरापर्यंत शेकडो आंदोलकांनी आसरा घेतला. सकाळी झोपेतून उठून हे आंदोलक पुन्हा आझाद मैदानात दाखल झाले आणि उपोषणात सहभागी झाले. “जोपर्यंत आरक्षणाची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आमचा मुक्काम सीएसएमटीवरच असेल,” असे आंदोलकांनी ठणकावून सांगितले.
पोलिसांचा कडक बंदोबस्त, वाहतुकीवर परिणाम
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरात 200 ते 250 अधिकाऱ्यांसह 1500 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सीएसएमटी स्टेशनजवळील जेजे ब्रिज आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या बाहेर आंदोलकांनी टेम्पो, ट्रक आणि बस पार्क केल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी केवळ एकच लेन वाहतुकीसाठी खुली आहे, त्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत आहे. तरीही, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी नियोजन केले आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा आणि चर्चा
मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली. मराठा आंदोलनासह बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही त्यांनी माहिती घेतली. या चर्चेतून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागणी पूर्ण होईपर्यंत लढा
मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. पावसाळी वातावरण आणि गैरसोयींना न जुमानता आंदोलकांचा उत्साह आणि एकजूट पाहण्यासारखी आहे. “आम्ही अन्याय सहन करणार नाही. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, नाहीतर आम्ही पाणीत्याग करू,” असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
आरक्षण घेऊनच परतणार; कार्यकर्ते आरक्षणाकरिता सायकलने गेले मुंबईला
कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा’, अशा घोषणा देत गुरुवारी सकाळी शहरातील शिवालयातून मुंबईकडे हजारोंच्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते वाहनाला भगवे झेंडे लावून, भगव्या टोप्या घालून रवाना झाले.
जरांगे पाटलांच्या समर्थनात मंगळवेढा शहर व तालुक्यातून दोन दिवसांपासून हजारोंच्या संख्येने तरुण आझाद मैदानावर पोहोचले आहेत. अद्याप कार्यकर्ते मुंबईतच असून आरक्षण मिळाल्याशिवाय परतणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
सायकलने केला ४०० किमीचा प्रवास
मराठा आरक्षणासाठी मंगळवेढा-मुंबई सायकल वारी काढल्याचा अभिमान आहे. चार दिवसात ४०० किमीचा प्रवास केला. दिवसांत १३ तास सायकलिंग केली. मुंबई वारीचे मंगळवेढा सकल मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करण्याचे भाग्य मिळाले. सिद्धेश्वर डोंगरे, मेजर तानाजी हेंबाडे यांचे सहकार्य लाभले. आरक्षण मिळाल्यावरच खरा आनंद होईल. प्रा. विनायक कलुब्रम्हे, आझाद मैदान.
मनोजदादांचा निर्णय झाल्याशिवाय परतणार नाही: २५ हजार आंदोलक
मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला गेलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून २५ हजार मराठा-बांधव बुधवारपासून शुक्रवारपर्यंत मुंबईला गेले आहेत. मनोज दादांचा निर्णय झाल्याशिवाय परतणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
माळशिरस तालुक्यातून काही जण २७तारखेलाच मुंबईला पोहोचले होते. गुरुवारी १६०० वाहने गेल्याचे कोअर कमिटीने छापलेल्या स्टिकर्सवरून स्पष्ट झाले. यामध्ये अकलूज येथून १००, बाभूळगाव ७५, नातेपुते ७०, निमगाव ६० अशी मोठी वाहने तसेच खासगी वाहनेही गेली आहेत. लवंग, मलोली, वेळापूर, बोंडले, तांदुळवाडी, तांबवे, वाघोली, संगम, बागेचीवाडी गावातून वाहने गेली. शुक्रवारीही २०० आंदोलक ४० गाड्यांमधून रवाना झाले. दुचाकी, एसटीनेही आंदोलक गेले.
संवेदनशीलतेने प्रश्न हाताळावा
राज्यातील मराठा समाजातील लाखो तरुण, विद्यार्थी व शेतकरीवर्ग या मागणीशी निगडीत आहेत. शासनाने संवेदनशीलतेने याप्रश्नी निर्णय घ्यावा. सामाजिक समतेसाठी मराठा आरक्षणाला प्राधान्य देऊन त्वरित कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे. धैर्यशील मोहिते पाटील, खासदार.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज