टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील दुध संकलन केंद्रांमध्ये दुधाचा दर निश्चित करण्यात आला आहे. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 30 रुपये दर आणि 5 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार दुध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लीटर ठरवून दिलेला देणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती, राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखें पाटील यांनी दिली आहे.
तसेच दुधाला ठरवून दिलेला दर न देणाऱ्या दूध संकलन केंद्रावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
सोबतच दूध भेसळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली असून, ज्या ठिकाणी दूध भेसळ आढळेल तेथे थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देखील देण्यात आल्याची माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे. ते अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
दुधात भेसळ आढळल्यास थेट गुन्हा
राज्य सरकारने दुधाच्या दरासंदर्भात येत्या चार दिवसांमध्ये ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा महामार्ग रोखत शेतकरी ‘शेतकऱ्यांचे मेगाब्लॉक’ आंदोलन सुरु करतील, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला होता.
तर दुधाला प्रति लिटर 40 रुपये हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कोतुळ येथे धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या धरणे आंदोलनाचा आजचा 26वा दिवस आहे.
दरम्यान, दूध हमीभावाबद्दल ठोस आश्वासन नसल्याने आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय या आंदोलकांनी घेतला आहे.
असे असताना राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखें पाटील यांनी आज हा निर्णय घेत दुध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लीटर 30 रुपये दर देणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील दूध उत्पादन शेतकरी या निर्णयाचे स्वागत करतात की, आपल्या 40 रुपयांच्या दारावर कायम राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्य सरकार दुधात भेसळ करणाऱ्या विरोधात कारवाईसाठी भक्कम कायदा तयार करण्याच्या तयारीत आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या विरोधात एमपीडीए लावला जाईल, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलताना दिली आहे.
एवढेच नाही तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांना जामीन मिळूच नये, अशी कठोर तरतूद राज्य सरकार त्या कायद्यात करणार आहे. या प्रस्तावित कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागासोबत डेयरी विभागाचे आणि पोलीस दलाचे अधिकारी संयुक्त पथकांमध्ये सहभागी केले जातील, असेही आत्राम म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसला येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या जागा वाटपातून किमान 90 जागा हव्या आहेत. या जागा आम्हाला महायुतीला जिंकवण्यासाठी हव्या आहेत असेही आत्राम म्हणाले. लवकरच अजितदादा पवार यांचा राज्यव्यापी दौरा सुरू होणार असून त्यानिमित्ताने ते विदर्भातही येतील, अशी माहिती ही आत्राम यांनी दिली.(स्रोत:ABP माझा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज