टीम मंगळवेढा टाइम्स।
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी आषाढी यात्रा कालावधीत महायुती सरकारने ३ ठिकाणी महाआरोग्य शिबीर घेत विक्रमी साडेअकरा लाख भाविकांना मोफत सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा पुरविल्या होत्या.
यंदाच्या आषाढीत ४ ठिकाणी महाआरोग्य शिबीर भरवून गतवर्षीपेक्षा दीडपट अधिक भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा संकल्प केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
आषाढी यात्रा कालावधीत मोफत महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत सोमवारी येथे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी ‘भैरवनाथ शुगर’ चे चेअरमन प्रा.शिवाजी सावंत, व्हा.चेअरमन अनिल सावंत, शाम गोगाव, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, राज्य आरोग्य शिक्षणचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव,
सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निंबकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके आदी प्रमुख उपस्थित होते. राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक ऑनलाईन सहभागी झाले होते.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, वाखरी येथे लाखो भाविकांसह सर्व संतांचे पालखी सोहळे मुक्कामी असतात. अडीचशे कि.मी. अंतर चालून थकलेल्या भाविकांसाठी या ठिकाणी पहिले तीन दिवस महाआरोग्य शिबीर सुरू राहील.
गोपाळपूर येथील दर्शन रांगेजवळ दुसरे, तर तीन रस्ता चौक येथे तिसरे महाआरोग्य शिबीर सुरू राहील. याशिवाय यंदा ६५ एकर येथे चौथे शिबीर घेण्यात येईल. अडीच ते तीन लाखांवर भाविक या ठिकाणी असतात. त्यांच्यासाठी हे शिबीर महत्वाचे ठरणार आहे.
सर्व ठिकाणी सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासणींसह मोफत उपचार दिले जातील. गतवर्षीच्या मोफत आरोग्य सेवेचा आमचाच विक्रम यंदा आम्ही मोडणार आहोत असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
‘भैरवनाथ शुगर’ उचलणार ८० टक्के खर्च
आषाढी यात्रा काळात महाआरोग्य शिबिरासाठी राज्य सरकारकडून केवळ औषध आणि डॉक्टरांची मदत घेत असून शेकडो स्वयंसेवकांसह इतर ८० टक्के खर्च हा प्रा. शिवाजी सावंत हे अध्यक्ष असलेल्या ‘भैरवनाथ शुगर’च्या ‘सीएसआर’ निधीतून करण्यात येत असल्याचेही आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
तज्ञ डॉक्टरांच्या सेवा
महाआरोग्य शिबिरात राज्यभरातील शासकीय तसेच नामांकित रुग्णालयांमधील तज्ञ डॉक्टरांच्या सेवा भाविकांना २४ तास उपलब्ध करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी करुन तात्काळ उपचार केले जातील. पालखी सोहळ्यांसोबतही सर्वत्र आरोग्य सेवा आणि मुबलक औषध पुरवठा ठेवला जाईल, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
आरोग्यमंत्र्यांसमोरच भाजप पदाधिकाऱ्याचा पारा चढला; तर सावंतांनीही भाजपच्या आजी-माजी आमदारांना फटकारलं
लोकसभा मतदारसंघाच्या निकालांनी राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलली आहे.एकीकडे लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर महायुतीत खटक्यावर खटके उडत असतानाच आता पंढरपूरमध्येही अशीच राजकीय तानातानी पाहायला मिळाली.
आरोग्यमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते तानाजी सावंत आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपली. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या 200 बेड विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन सोमवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमावर भाजप आमदार समाधान आवताडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. यामुळे पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात नवा पेटण्याची शक्यता आहे
सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडे यांच्यासह माजी आमदारांची निमंत्रण पत्रिकेत नावेही छापण्यात आली होती.
परंतु,आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा कार्यक्रम भाजपचे आमदार समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक व इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ठरविण्यात आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर करण्यात आला आहे.
महायुती सरकारमधील मंत्री तानाजी सावंत आणि भाजप आमदार समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.या नेत्यांमधील नाराजीनाट्य एकमेकांचा निषेध नोंदवण्यापर्यंत पोहचले. त्यामुळे या कार्यक्रमाकडे आमदार समाधान आवताडे यांच्यासह माजी आमदार प्रशांत परिचारक आणि जिल्ह्यातील इतर नेतेमंडळींनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
भाजप पदाधिकारी काय म्हणाला..?
माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख यांनी कार्यक्रम सुरु असतानाच आरोग्य विभागाने भाजपच्या आजी-माजी आमदारांना विश्वासात न घेता कार्यक्रम ठरविल्याचा थेट आरोप केला.
ते म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीमध्ये विस्तारीकरणाच्या कामात भाजपच्या आजी माजी आमदारांचा मोठा वाटा आहे. असे असतानाही त्यांना विश्वासात न घेता कार्यक्रम घेतला आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पत्रिकेत नाव टाकले नाही. त्यांचा तो अपमान असल्याची टीका त्यांनी केली.
यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, पत्रिका छापण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडे असते, प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी पत्रिका छापली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघातील हा कार्यक्रम आहे. त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे होते.
लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास याला जर कोणी नख लावण्याचा काम करत असेल तर त्याचाही मी याच व्यासपीठावरुन सर्वांच्या साक्षीने निषेध करतो.(स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज