टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज चुरशीने 57.46 टक्के मतदान झाले आहे. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये 58.45 टक्के मतदान झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास एक टक्के मतदान घटल्याचे दिसून येत आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका कोणला बसणार, याची चर्चा आता रंगली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात झाले असून ते 60.16 टक्के झाले आहे, त्यापाठोपाठ भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या पंढरपूर-मंगळेवढा विधानसभा मतदारसंघात 58.09% मतदान झाले आहे.
सोलापूर शहर उत्तर मतदार संघात 56.81 टक्के, तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात 56.32% एवढे मतदान झाले आहे. हा मतदारसंघ हा आमदार प्रणिती शिंदे यांचा आहे. सोलापूर शहर उत्तर मतदार संघ हा माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट मतदार संघात 55.31% मतदान झाले आहे, तर माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर या मतदारसंघात 58.21% एवढे मतदान झाले आहे. आता यातील कोणत्या मतदारसंघाने कोणाला हात दिला, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.
उन्हाचा संभाव्य तडाका लक्षात घेता सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. दुपारच्या उन्हामुळे ही गर्दी काहीशी मंदावली होती. मात्र, दुपारी चारनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या पुन्हा रांगा लागल्या होत्या.
रात्री उशिरापर्यंत लागलेल्या रांगामुळेच मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून येत आहे. कारण, सायंकाळी पाचपर्यंत सोलापूर मतदारसंघात 49.85% एवढे मतदान झाले होते, सायंकाळी पाचनंतर सहापर्यंत म्हणजे एक तासाच्या मतदानात तब्बल साडेसात टक्के मतदान झाल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात जोरदार लढाई झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी चुरशीने मतदान झाले. किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सोलापूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाले.(स्रोत:सरकारनामा)
सायंकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघ झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता सर्वाधिक ५२.२२ टक्के मतदान मोहोळ येथे झाले. तर सर्वात कमी मतदान ४७.०१ टक्के मतदान सोलापूर शहर मध्य मतदारसंघात झाले.
सोलापूर शहर उत्तर-५१.२१ टक्के, दक्षिण सोलापूर-५१.८८ टक्के, अक्कलकोट-४७.८५ टक्के आणि पंढरपूर-मंगळवेढा येथे ४९.१० टक्के मतदान झाले होते.
सकाळपासून सायंकाळी मतदान संपेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसत होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज