टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवार, ७ मे रोजी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी सहापर्यंत मतदान सुरू राहील,
सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार ६०० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. एकूण ४० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सोलापुरात २० लाख तर माढ्यातील १९ लाख ९१ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुज्ञ मतदार खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सोलापुरात २१ उमेदवार तर माढ्यात ३२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांचे भविष्य मंगळवारी ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार असून याच दिवशी उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममधून खुले होईल.
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे तसेच भाजपचे राम सातपुते यांच्यात मुख्य लढत आहे. तर माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील तसेच भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोघे आमनेसामने आहेत.
तिथेही प्रचंड राजकीय चुरस निर्माण झाली आहे. मतदार कोणाच्या बाजूने कौल देतील, हे येत्या ४ जूनला कळेल. तूर्त जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आवश्यक उपाययोजनांसह मतदानाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर, माढ्यासाठी 20 हजार कर्मचारी
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांत १९ हजार ८२७ निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात १५ हजार ८०० पुरुष, तसेच ३ हजार ८८७ महिला कर्मचाऱ्याऱ्यांचा समावेश आहे.
स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाल्यानंतर ईव्हीएम / व्हीव्हीपॅट मशीन शासकीय धान्य गोदाम रामवाडी सोलापूर येथे ठेवण्यात येणार असून दिनांक ४ जून २०२४ रोजी ची मतमोजणी देखील रामवाडी गोदाम येथे होणार आहे
मतदान केंद्रांवर काय असतील सुविधा?
दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सोय. पिण्यायोग्य पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच सावलीसाठी मतदान केंद्रासमोर मंडपाची सोय असणार आहे.
उष्माघातापासून बचाव करण्याकरिता मतदारांना गरजेनुसार ओआरएस ज्यूस देण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी व्हिल चेअरची सोय असणार आहे. मदत कक्ष स्थापन करून केंद्रावर
स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ५ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रासाठी भिन्न रंगाचा वापर करण्यात येणार आहे.(स्रोत;लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज