टीम मंगळवेढा टाईम्स।
माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमधल्या सभेत काल केलं.
सोलापूर दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी यावेळी विजयसिंह मोहिते पाटील आणि माढ्याचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह उत्तम जानकर यांना इशारा दिला.
जवळ केलेल्यांनी किंमत ठेवली नाही म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केलीय.
रविवारी अकलूजमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेमध्ये बोलताना मोहिते पाटील कुटुंबियांना लक्ष्य केलं. आता खऱ्या अर्थाने परतफेड करण्याची वेळ आली होती.
पण यावेळी त्यांनी पुन्हा पवारांचा हात पकडला. मला आता त्याची चिंता नाही. मला विश्वास आहे, की जनतेच्या मनात पंतप्रधान मोदी आहेत. त्यामुळे कोणी कितीही विश्वासघात केला तरी जनता विकासकामाला जागून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना निवडून देणार’, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.
त्यावर आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल! आणि आज ज्याला तुम्ही ईश्वराचा आशीर्वाद म्हणताय ना ते आशीर्वाद नाही तर सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत. तुम्ही कुणाला येडं बनवता? ईश्वराचा आशीर्वाद कुणाला आहे, हे ४ जूनला स्पष्ट होईल,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“मी कोणाच्या वाट्याला जात नाही. कोणाचं वाईट चिंतत नाही आणि कोणाला त्रासही देत नाही. माझ्यावर ईश्वराचा आशिर्वाद आहे. आई तुळजाभवानीचा आशिर्वाद आहे.. पांडुरंगांचा आशिर्वाद आहे… कोणी माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडतच नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
उत्तमराव जानकरांचा पोपट म्हणून उल्लेख
“आता तुमच्याकडचे काही पोपट बोलायला लागलेत. त्यांनाही आम्हीच मोठे केले आहे. आता ते अजितदादांवर बोलतात, भाजपवर टीका करतात. रातोरात त्यांना राष्ट्रीय नेते झाल्यासारखे वाटायला लागलं आहे. त्यांना मोठे करण्यात माळशिरसची जनता आहे. जनतेला वाटले होते की ते संघर्ष करतील पण त्यांनी समझोता केला. आता जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही,” अशा शब्दात फडणवीसांनी जानकरांना लक्ष्य केलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज