टीम मंगळवेढा टाईम्स म
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेसीबी मालकांवर गुन्हे दाखल करणे बंद करावे. अन्यथा मी महाराष्ट्रात फिरुन मराठा समाज जागा करेन, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मनोज जरांगे पाटील हे आज बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमध्ये झालेल्या इशारा सभेत वापरण्यात आलेल्या जेसीबी मालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
यावर बोलताना म्हणून जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री गुन्हे दाखल करणार नाहीत असे म्हणतात आणि गृहमंत्री गुन्हे दाखल करायला लावतात. हे गुन्हे दाखल करणे थांबले नाही तर परवापासून महाराष्ट्राचा दौरा करावा लागेल आणि संपूर्ण मराठा समाज जागा करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकारला मराठा समाजाबद्दल द्वेष आहे म्हणून बैठकांना परवानगी नाकारली जाते. मनोज जरांगे पाटील यांची परळीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीला सुरुवातीला परवानगी नाकारण्यात आली होती.
मात्र, नंतर जरांगे पाटील यांना बैठक घेण्यास सशर्त परवानगी देण्यात आली. यावरच बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना कायदा लागू होत नाही का?
राजकीय नेते सभा घेतात त्यांना परवानगी मिळते मग आम्ही सामाजिक बैठका घेऊ शकत नाहीत का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला असून सरकार जरी आमच्यासोबत अन्यायाने वागत असलं तरी न्यायदेवता योग्य न्याय करेल, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
सरकारने खोटे बोलून डाव टाकला आता 24 तारखेला मराठा समाज डाव टाकेल: जरांगे पाटील
आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सरकारने सगेसोयरे अधिसूचना जारी करणार म्हणून कॅबिनेट बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही आणि आचारसंहितेचा कारण पुढे करून सरकारने डाव जरी टाकला असला तरी 24 तारखेला जी महत्त्वाची बैठक होणार आहे.
त्या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असून 900 एकरावर सभा नेमकी कुठे घ्यायची याची देखील घोषणा त्या बैठकीत करणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
तर 10 टक्के आरक्षण आम्हाला मान्य नसून सध्याची भरती सरकारकडून करण्यात येत आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येत नसल्याचे अनेक फोन येत आहेत. ज्यांना हे आरक्षण घ्यायचे असेल त्यांनी ते घ्यावं आमचं बंधन नाही. मात्र आम्ही ओबीसीतून आरक्षण घेण्यावर ठाम असल्याचे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज