टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मार्च रोजी बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत राज्यसभेचे खासदार शरद पवार यांचे नाव वगळण्यात आले आहे.
पत्रिकेवर खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावे आहेत. मात्र राज्यसभेचे खासदार असलेले शरद पवार यांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत नाही आणि त्यांना याचे आमंत्रण देखील देण्यात आलेले नाही.
दरम्यान, शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या घरी म्हणजेच गोविंदबागेत जेवणाचे आमंत्रण दिले आहे. शरद पवार यांच्या गुगलीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.
पवारांच्या आमंत्रणाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय उत्तर देतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.बारामतीत होणाऱ्या कार्यक्रमाला शरद पवार यांना बोलवण्यात न आल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी आश्चर्य व्यक्त केले. २०१५च्या जीआरनुसार अशा कार्यक्रमांना स्थानिक लोकसभा आणि राज्यसभा खासदारांचे नाव घालावे लागते.
शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेत. कार्यक्रमपत्रिकेत वंदना चव्हाण यांचे नाव आहे पण पवारांचे नाही. हे का झाले याचे उत्तर माझ्याकडेही नाही. याचे उत्तर प्रोटोकॉल विभागाला विचारावे लागले, असे त्या म्हणाल्या.मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमत: येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे.
बारामती येथील गोविंदबाग ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वी दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांना ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्विकार करावा, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
तसेच दोन्ही सस्नेह आमंत्रणाचा आपण स्विकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे त्यांनी म्हटले आहे.विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी शरद पवारांनी वेळ राखून ठेवला होता. पण सरकारकडून त्यांना आमंत्रण दिले नाही. शरद पवारांनी बारामतीला येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना घरी जेवणाचे आमंत्रण दिले आहे.
शरद पवारांनी आधी फोनवरून हे आमंत्रण दिले होते. त्याच बरोबर त्यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे. बारामतीत होणाऱ्या या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. जेवणाच्या आमंत्रणाबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीत जेव्हा कोणी येते तेव्हा शरद पवार यांना गोविंदबागेत जेवायला बोलवतात.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देखील बारामतीत आल्यावर पवारांनी त्यांना घरी जेवणासाठी बोलवले होते, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली. ज्या विद्या प्रतिष्ठानची स्थापना शरद पवार आणि इतरांनी मिळून ५० वर्षांपूर्वी केली होती. त्याच ठिकाणी हा कार्यक्रम होतो ही आनंदाची बाब असल्याचे सुळे म्हणाल्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज