टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्याच्या अर्थसंकल्पातून सोलापूर शहर- जिल्ह्यासाठी काहीतरी ठोस मिळेल, असा विश्वास सर्वांनाच होता. एका विधान परिषदेच्या आमदारासह जिल्ह्यात महायुतीचे ११ आमदार आहेत.
परंतु, पंढरपूर- फलटण रेल्वे मार्ग वगळता सोलापूर जिल्ह्यासाठी ठोस असे काहीच मिळाले नसल्याने सोलापूरकरांच्या पदरी निराशाच पडली असल्याची बातमी आज ‘सकाळ’ने प्रसिध्द केली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा उल्लेख करीत त्याच्या अंमलबजावणीनंतर किती जणांना लाभ मिळेल, याचा आवर्जून या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी उल्लेख केला. त्यात सोलापूरच्या रे नगर व सोलापूर- धाराशिव रेल्वे मार्गाचाही उल्लेख झाला.
मात्र, सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी एखादा मोठा उद्योग उभारला जाईल किंवा सोलापूरची विमानसेवा कधीपासून सुरू होईल, यासंदर्भात काहीही उल्लेख झाला नाही.
अंगणवाड्यांना सौरऊर्जा प्रकल्प, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना, जलजीवन मिशन, रस्ते, लेक लाडकी अशा योजनांतून राज्यातील कितीजणांना लाभ मिळेल, याचा लेखाजोखा अर्थसंकल्पातून मांडण्यात आला.
सोलापूर- धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे, पण कामाला प्रत्यक्षात कधीपासून सुरवात होईल यावर भाष्य झाले नाही. पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५० टक्के हिस्सा देण्याचे मान्य केले.
त्याशिवाय शेतकऱ्यांसह सोलापूरकरांना राज्याच्या अर्थसंकल्पातून ठोस असे काहीच मिळालेले नाही. तरीदेखील, जिल्ह्यातील बहुतेक विशेषतः भाजप आमदारांनी अर्थसंकल्प राज्याला पुढे नेणारा व सोलापूरच्या विकासाला चालना देणारा असल्याचे म्हटले, आहे हे विशेष.
टेक्स्टाईलसाठी काहीच नाही
सोलापूर शहरात टेक्स्टाईल उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना सौरऊर्जा प्रकल्पासाठी ५० टक्के अनुदान मिळावे, अशी मागणी आहे. यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे आणि नवीन उद्योगांना पूर्वी व्याज अनुदान मिळत होते, त्या धर्तीवर एकरकमी भांडवली अनुदान मिळणे अपेक्षित होते.
पण, अर्थसंकल्पातून काहीच हाती लागल्याचे दिसत नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी बोलताना दिली.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज