टीम मंगळवेढा टाईम्स।
हुंडयाचे पैशासाठी मानसिक व शारीरिक त्रास देवून उपाशी ठेवत सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळुन काजल अण्णासाहेब मोरे (वय 21 वर्ष रा.ढवळस ता.मंगळवेढा) या विवाहितेने रहाते घरी फॅनला साडीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना दि.8 डिसेंबर रोजी घडली आहे.
याप्रकरणी सासु अलका सिद्धेश्वर मोरे, नणंद सोनाली सतिश जाधव, नवरा अण्णासाहेब मोरे सासरा माजी सरपंच प्रा.सिद्धेश्वर मोरे सर्व (रा.ढवळस ता.मंगळवेढा) या चौघाविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
याबाबत सुरेश मुरलीधर घाडगे, (रा.देगाव ता.पंढरपुर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की पुतणी काजल वय 21 वर्षे हिचा विवाह दि. 25 एप्रिल 2021 रोजी आण्णासाहेब सिध्देश्वर मोरे रा. ढवळस याच्याशी झाला होता. लग्नावेळी हुंडा म्हणून 11 तोळे सोने दिले होते.
अजून 10 तोले सोने द्यावे यासाठी सासरच्या मंडळीनी लग्नाचे वेळेस लग्न थांबवून वाद काढला होता. त्यावेळी ऊस कारखान्याला गेल्यानंतर आम्ही तुम्हाला थोडेफार पैसे देवू अशी समजूत घातली.
त्यानंतर मात्र वारंवार सासरा सिध्देश्वर, सासु अलका, पती अण्णासाहेब, नणंद सोनाली सतिश जाधव हे सर्वजन काजल हिला 10 तोळे सोने दिले नाही म्हणून नेहमी मारहाण करुन उपाशी पोटी कोंडून ठेवतात. शिवीगाळ करून मानसिक त्रास देत आहे असे अनेकवेळा काजलने आई व चुलते यांना सांगितले होते.
परंतु माहेरच्या लोकांनी काजल हिला धीर थोडे दिवस त्रास सहन कर नंतर सर्व ठिक होईलअसे सांगितले. तसेच सासरच्या मंडळींना देखील आमच्या मुलीला त्रास देत जाऊ नका तिला कोंडुन ठेवु नका तिला मारहाण करत जाऊ नका असे सांगितले.
त्यावेळी सासू सासऱ्यांनी आम्हाला हुड्यातील सोने देऊ नका गाळे बांधण्यासाठी राहिलेला हुंडा म्हणुन दहा लाख रुपये दया असे सांगितले.
त्यावेळी तेव्हा त्यांना रोख स्वरुपात पाच लाख रुपये दिले. परंतु राहिलेले हुंड्याचे पैशांसाठी ते नेहमी जाच करीत तसेच दिवाळीला गेल्यावर राहिलेले पाच लाख रुपये घेऊन ये. लवकर हुंड्याचे पैसे दिले नाहीत तर आम्ही काजल हिला जिवंत सोडणार नाही असे म्हणत होते.
तसेच तिने हुंड्यासाठी माझा छळ करीत आहेत. माझ्याकडे लहान मुलाला येवु देत नाहीत शिवीगाळ, मारहाण असा त्रास देत आहेत. त्यामुळे मला जगणे असह्य झाले आहे असे तिने आईला व गावाकडील मैत्रिणीला अनेकदा सांगितले होते.
दि.8 रोजी 9 च्या पूर्वी चौघांच्या त्रासाला कटाळून फॅनला साडीने गळफास घेवुन काजल हिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरील चौघांविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास ए पी आय वाघमोडे करीत आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती देगाव येथील नातेवाईक यांना मिळताच ते तातडीने ढवलस येथे आले. त्यावेळी सासरे काजलच्या मृत्यू बाबत चुकीची माहिती देत असल्याने संतप्त नातेवाईकांनी घराची नासधूस करीत सासरे सासू, नवरा, नणंद यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी पोलिस आल्याने पुढील अनर्थ टळला.
तसेच नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर एकच गर्दी करीत त्या चौघाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्री उशिरा शव विच्छेदन झाल्यानंतर देगाव येथे म्हणजे मुलीच्या माहेरी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काजल हिला दीड वर्षाचा लहान मुलगा असून त्याच्या आईच्या आठवणीने रडण्यामुळे उपस्थितांचे हृदय हेलावले. त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. काजल हिच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दोषी आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज