टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील आठवड्यात कांद्याचा दर घसरला होता. तब्बल १ हजार दर कमी झाल्याने शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी आवक घटली होती. शुक्रवारी जवळपास ५०० ट्रक आवक होती. सोमवारी मात्र, ४२९ ट्रक कांदा आला होता. त्यामुळे घसरलेला दर पुन्हा पाच हजारांवर गेला पोहोचला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर, पुणे, सांगली जिल्ह्यातूनही कांद्याची आवक असते. याशिवाय कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, आळंद, बिदर या भागांतूनही मोठ्या प्रमाणात कांदा सोलापुरात येतो.
यंदा कांदा लागवडीनंतर महिनाभरात पाऊस न झाल्याने करपू गेला. त्याचा परिणाम दरावर आणि मागणीवर झाला आहे. मागील महिन्यात कांद्याचा दर साडेआठ हजारांच्या वर गेला होता.
त्यामुळे दिवाळीमध्ये दहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळण्याची आशा व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, दिवाळी सणात कांद्याचा वांदा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर, सोलापूर बाजार समितीतील कांद्याचा दरही खाली आला. दिवाळीनंतर सोलापूर यार्डात आवक वाढली होती. सरासरी ४०० ते ५०० ट्रक कांद्याची आवक सुरू होती. त्याचा परिणाम दरावर झाला आणि पाच हजारांवरून दर ४,४०० पर्यंत खाली आला.
सोमवारी आवक घटली होती. मात्र, दर वाढल्याचे दिसून आले. आता पुढील काही दिवस दर पाच हजारांच्या आसपासच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
जानेवारीत होणार मोठी आवक
परतीच्या पावसानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झालेली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात कांद्याची आवक वाढणार आहे. तेव्हा सरासरी ८०० ते १ हजार ट्रक आवक होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये अवकाळीचा फटका बसला आहे. त्यामुळे सोलापुरातील कांद्याला दर मिळण्याची आशा आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.(स्रोत:लोकमत)
सध्या बाजार समितीत चांगल्या कांद्याला दर चांगलाच मिळत आहे. वर्षभर आवक असल्याने कांदा मार्केटमधून मोठी उलाढाल होत आहे. त्याच्या बाजार समितीला चांगला फायदा होत आहे. शेतकऱ्यांना वेळेत पट्टी आडत्यांकडून मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. -श्रीशैल नरोळे, उपसभापती, बाजार समिती, सोलापूर.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज