टीम मंगळवेढा टाईम्स।
लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या सहाजणांच्या टोळीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पहिला विवाह झालेला असतानाही, दुसऱ्या पुरुषाशी तीन लाख रुपये घेऊन लग्न करून फक्त दोन महिने संबंधित महिला राहिली.
त्यानंतर तिने तिसऱ्या व्यक्तीशीही विवाह केला असल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात उघडकीस आला आहे. यामध्ये विवाह करणाऱ्या संबंधित २० वर्षाच्या महिलेसह सहा जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेले संशयित हे पिंपळवाडी येथील तर फिर्यादी हे गुळसडी येथील आहेत. गुळसडी येथील सुनील गणपत भोसले (वय ३२) यांचा पिंपळवाडी येथील २० वर्षाच्या तरुणीशी २०२२ मध्ये विवाह झाला होता.
हा विवाह जुळवताना तिच्या माहेरच्या मंडळीने पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोड करून त्यांच्यात तीन लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार तीन लाख रुपये देण्याचे ठरले आणि आळंदीदेवाची येथे हा विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर दोन महिने संबंधित तरुणी सासरी राहिली.
मात्र नंतर तिला माहेरच्या मंडळींकडून त्याच्याबरोबर राहू नको, असे म्हणून फोन येऊ लागले. एके दिवशी तिला माहेरच्या मंडळींनी सासरवरून नेले, ती परत आलीच नाही.
फिर्यादीने तिला सासरी नांदायला आणण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा तिचे दुसऱ्या व्यक्तीशी लग्न लावले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पहिले लग्न झालेली नगर जिल्ह्यातील (कुळधरण) येथील व्यक्ती गुळसडी येथे आली.
त्याने २०२० मध्ये संबंधित मुलीशी लग्न झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर गुळसडी येथे झालेले दुसरे लग्न आणि त्यानंतर तिसरे लग्न झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत करमाळा पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
करिना राजेंद्र चव्हाण (वय २०), राजेंद्र सोपान चव्हाण (वय ४५), कुसुम राजेंद्र चव्हाण (वय ४०), सिद्धार्थ राजेंद्र चव्हाण (वय २४), राहुल रामदास कांबळे (वय ३२) व आदिनाथ सीताराम चव्हाण (वय ४५, सर्व रा. पिंपळवाडी, ता. करमाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज