टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूरच्या दिशेने वारीनिमित्त दरवर्षी लाखो भाविक पायी चालत येतात. त्यावेळी खूपवेळा रस्ते अपघातात अनेक वारकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे.
या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक वारी मार्गावर पेट्रोलिंग करावे, स्पीकरद्वारे सातत्याने त्यांना सूचना द्याव्यात असे आदेश नुतन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी (ता. करवीर) येथील माऊली भजनी मंडळाचे वारकरी कार्तिकी वारीसाठी पंढरीच्या दिशेने येत होते.
सोमवारी रात्री सातच्या सुमारास दिंडी सांगोला-मिरज रस्त्यावरील जुनोनी बायपासजवळ आली होती. त्यावेळी भरधाव वेगाने जाणारी कार दिंडीत शिरली आणि त्यात सात वारकरी ठार झाले.
मृतांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एक मुलगा आहे. पाचजण गंभीर असून त्यांच्यावर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व सोलापुरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
दरम्यान, दरवर्षी अशा अपघातांना वारकरी सामोरे जातात, पण वारी चुकू देत नाहीत. विठुरायाच्या दर्शनासाठी ते कोसो दूरवरून पायी चालत येतात.
रात्रीचा अंधार, वाहनचालकांचा बेशिस्तपणा, प्रशासनाचे दुर्लक्ष अशी बरीच कारणे अपघाताला कारणीभूत आहेत. त्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आता नुतन पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी कंबर कसली आहे.
आता दिंडी जिल्ह्यात प्रवेश करताच अधिकारी वारी मार्गावर सातत्याने पेट्रोलिंग
त्यांच्या आदेशानुसार आता दिंडी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी वारी मार्गावर सातत्याने पेट्रोलिंग करतील.
वाकऱ्यांनी सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंतच चालावे
महामार्गांवरील वाहनांचा वेग वाढला असून वारी काळातील बहुतेक अपघात रात्रीच्यावेळीच झाले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनी सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंतच चालावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी केले आहे.
सुरक्षिततेसाठी रस्त्यावरील पांढऱ्या पट्टीच्या खालून प्रत्येकांनी चालणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
उद्या गुरुवारी कार्तिकी वारी आहे. सोलापूर, कोल्हापूर, बीड, नगर, सांगली, सातारा, पुण्यासह परराज्यातून पाच ते सहा लाख भाविक येतील, असा अंदाज ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वारीसाठी होमगार्डसह वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंमलदार असा एकूण पाच हजारांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी सोमवार-मंगळवारी पंढरपूरला भेट दिली.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज