टीम मंगळवेढा टाईम्स।
महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोमवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यामध्ये देवदर्शन, अभिवादन, स्नेहभोजन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सोमवारी पंढरपूर येथे आगमन व तेथेच मुक्काम असून, मंगळवारी सकाळी ८.४५ वाजता पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे देवदर्शनानंतर साडेदहा वाजता मोटारीने सोलापूरकडे आगमन.
छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज, चार हुतात्मे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अकरा वाजता सोलापुरातील सिद्धेश्वर महाराज मंदिरात दर्शन.
यासह सोलापूर शहरातील विविध राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जाणार आहेत.
नियोजन भवनात बैठक
साडेअकरा वाजता नियोजन भवन येथे , बारा वाजता मुख्यमंत्री सडक योजनाबाबत बैठक, साडेबारा वाजता पंढरपूर विकास आराखडा सादरीकरण बैठक,
बारा पंचेचाळीस वाजता लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या समवेत बैठक, स्थळ हॉटेल हेरिटेज सोलापूर.
अक्कलकोट, गाणगापूर तसेच तुळजापूर येथेही दर्शनासाठी पालकमंत्री विखे-पाटील जाणार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर मंदिर परिसरातील लाईट अँड साऊंड शोचे लोकार्पण होणार आहे.
सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेतून सोलापूरला मिळालेल्या ५२७ कोटी रुपयांच्या निधीला नव्या सरकारकडून स्थगिती देण्यात आलेली आहे.
शिंदे सरकारमधील पालकमंत्री या निधीचा फेरआढावा घेणार आहेत. सोलापूरचे नवे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात मंगळवारी दुपारी सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असल्याने स्थगित केलेल्या ५२७ कोटींच्या निधीबाबत विखे-पाटील मार्ग काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ब्रेक लावला होता.
नव्या सरकारमधील नव्या पालकमंत्र्यांनी आढावा घेतल्यानंतर हा निधी वापराचा मार्ग मोकळा होणार आहे. या योजनेतून सोलापूरला ५२७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी आषाढी एकादशीसाठी फक्त ८८ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे.
शिंदे सरकारने ४ जुलैला काढलेल्या परिपत्रकामुळे जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करण्यास तब्बल तीन महिने (४ जुलै ते ४ ऑक्टोबर) विलंब लागला आहे.
सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर विखे-पाटील पहिल्यांदाच मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक व इतर बैठका घेणार आहेत. या बैठकीत पूर्वीच्या सरकारने वाटप केलेल्या निधीचा फेरआढावा घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतील ५२७ कोटी रुपयांच्या निधी वाटपाचा मार्ग मोकळा करून दिला जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हाधिकारी स्तरावरील कामांसाठी २२८ कोटी, नागरी क्षेत्रातील योजनांसाठी १२४ कोटी तर जिल्हा परिषद स्तरावरील योजनांसाठी १७४ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
डीपीसीच्या बैठकीला केवळ आमदार, खासदारांचीच उपस्थिती?
जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिकेवर प्रशासक असल्याने या संस्थांमधून जिल्हा नियोजन समितीवर येणाऱ्या सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. तत्कालिन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी नियुक्त केलेल्या नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या जागा महाविकास आघाडीचे सरकार गेल्याने रिक्त झाल्या आहेत.
पालकमंत्री विखे-पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जिल्ह्यातील आमदार, खासदार व अधिकारी एवढेच उपस्थित राहून निधी वाटपाचा फेरआढावा घेणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज