टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील काळात दामाजी सहकारी साखर कारखाना आणि पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भालके गटाचा निसटता पराभव झाला होता, त्यामुळे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी आज काहींशी सावध भूमिका घेतल्याचे दिसले.
दामाजी कारखान्याच्या निवडणुकीसाठी व्यासपीठावरील नेत्यांनी अगोदर आपली एकजूट दाखवावी, यासाठी हातवर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
त्यानंतर उपस्थित सर्व नेत्यांनी हात वर करत एकजुटीचे दर्शन घडविले. मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या समविचारी नेतेमंडळींचा मेळावा
आयोजित करण्यात आली होती. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके होते.
यावेळी राहूल शहा, बबनराव आवताडे, लतीफ तांबोळी, शशिकांत बुगडे, प्रकाश गायकवाड, तानाजी खरात, बसवराज पाटील, सोमनाथ माळी, संजय कट्टे, मारूती वाकडे, तानाजी काकडे, भारत नागणे, दादा गरंडे, पी.बी.पाटील, सोमनाथ माळी, चंद्रशेखर कौंडुभैरी, नितीन नकाते, दत्तात्रय खडतरे, ईश्वर गडदे उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना आप्पा चोपडे म्हणाले की, दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार समाधान आवताडे गटाला पराभूत करण्यासाठी व्यासपीठावरील समविचारी नेत्यांची आधी एकी करा.
जागेसाठी अडू नका आणि हळकुंडासाठी लगीन मोडू नका. सध्या कारखान्यांसाठी व्यासपीठावरील नेत्यांनी आपापल्यातील मतभेद विसरून सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही.
सभासद व कामगारांमधील असंतोषाला वाट करून देताना कोणताही नवीन प्रकल्प सुरू न करताना वाढलेल्या कर्जाचे समर्थन करू शकणार नाही, असेही त्यांनी कारखान्याच्या कारभाराबाबत बोलताना सांगितले.
ॲड राहुल घुले म्हणाले की, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा फक्त प्रचारापुरता वापर न करता खांद्याला खांदा लावून सोबत राहू. पण आमचाही विचार करा, अशी मागणी त्यांनी केली.
दुर्योधन पुजारी यांनी सभासद म्हणून या काखान्याच्या वार्षिक सभेत एक शब्दही बोलू शकलो नाही, अशी खंत व्यक्त केली.
रामचंद्र वाकडे म्हणाले की, उमेदवार निवडत असताना ज्यांना ७०० मते मिळवतील अशांना संधी द्यावी. दामोदर देशमुख म्हणाले की, दामाजी कारखान्याची पुन्हा निवडणूक व्हायची असेल तर सध्याचे संचालक मंडळ हटवले पाहिजे.
माजी अध्यक्ष ॲड नंदकुमार पवार म्हणाले की, बॅगॅस, मोलॅसिस, साखर, कोट्यवधींचे भंगार शिल्लक असताना आम्ही सत्ता सोडली होती. पण, विद्यमान संचालक मंडळाने काही शिल्लक ठेवले नाही.
नवीन संचालक मंडळाला एफआरपीसाठी ३० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. दामाजी कारखाना संचालकांनी; नव्हे तर कामगारांनी चालवला, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
भगिरथ भालके म्हणाले की, (स्व.) कि. रा. मर्दा ऊर्फ मारवाडी वकील आणि (स्व.) रतनचंद शहा यांच्या काळातील काहींचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
आता दुर्लक्ष केले तर भविष्यात निवडणुकीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मीही ९७ व्या घटना दुरूस्तीचा आधार घेऊन दामाजीसारखे विठ्ठलचे सभासद रद्द करू शकलो असतो.
पण, २८ हजार सभासदांमधील मृतांच्या वारसांना सभासदत्व देण्याचे काम केले. पण, ते पाप मी केले नाही. समज गैरसमज पसरवल्याने सत्ताबद्दल झाला.
सुमारे ३ लाख ६९ हजार ७०५ पोते साखर आणि १० हजार टन मोलॅसिस असे ११६ कोटीची मालमत्ता शिल्लक होती. त्यावेळी देणी १०५ कोटी होती. असे असताना अफवा पसरवल्या गेल्या.
स्व.भारतनानांनी सभासद वाढवले. कामगार व सभासदांची देणी दिली असतानाही २०१६ मध्ये सत्तांतर का झाले, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. (स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज