टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हा शिक्षक संघाच्या वतीने आजपासून जिल्हा परिषदेसमोर तीन दिवसांचे साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सरचिटणीस बब्रुवाहन काशिद यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत अनेकदा शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली, निवेदने दिली, लाक्षणिक आंदोलने केली.
पण, केवळ प्रश्न सोडविण्याच्या आश्वासनाशिवाय काहीच मार्ग निघालेला नाही. दरम्यान, राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये वर्षापूर्वीच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक झालेली आहे.
आता बदली पोर्टलला रिक्त जागा कळविल्यानंतर हा प्रश्न सोडविणे कठीण होणार आहे. त्यामुळे विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख पदोन्नती करणे, समाजशास्त्र विषयाचा नकार मंजूर करून विज्ञान विषय शिक्षक नेमणूक करणे,
कन्नड, उर्दू माध्यमाच्या मुख्याध्यापकांचे समायोजन करणे, डीसीपीसी धारकांच्या कपातीचा हिशोब देणे, पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणीचा लाभ देणे,
या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी शिक्षक संघाचे १८, १९ व २० एप्रिल रोजी साखळी उपोषण असेल, असे कोषाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी सांगितले.
विज्ञान विषयाच्या गेल्या पाच-सहा वर्षापासून नियुक्ती दिली जात नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. तरीही, हा प्रश्न सुटलेला नाही.
तीन दिवसांचे साखळी उपोषण करूनही जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास २१ एप्रिलपासून शिक्षक संघाचे कार्यकर्ते त्याच ठिकाणी आमरण उपोषण सुरु करतील. – म. ज. मोरे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ, सोलापूर
प्रशासनामुळेच विद्यार्थ्यांचे नुकसान
सर्वसाधारण बदल्या २०२२ पूर्वी विज्ञान विषय शिक्षक नियुक्तीचा प्रश्न मिटावा, अशी मागणी आहे.
तीन-चार वर्षांपूर्वीच बीएससी व बारावी सायन्स असलेल्या शिक्षकांना विज्ञान विषय शिक्षकांची नियुक्ती दिली असती, तर तीन वर्षात आतापर्यंत बरेच प्राथमिक शिक्षक बीएससी झाले असते.
परंतु, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला, असा आरोप सोलापूर जिल्हा शिक्षक संघाने केला आहे.
शिक्षक आमदार निवांतच?
शिक्षकांचा प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहिन म्हणून शिक्षकांमधून आमदार झालेले जयंत आसगावकर हे शिक्षकांच्या प्रश्नावर म्हणावे वढे गंभीर नसल्याने शिक्षकांना मुलांचे शिक्षण सोडून आंदोलन करावे लागत असल्याची चर्चा आहे.
मागील तीन-चार वर्षांपूर्वीच्याच प्रलंबित प्रश्नांवर शिक्षकांना उपोषण, आंदोलन असे मार्ग अवलंबावे लागत आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज