टीम मंगळवेढा टाईम्स ।
बार्शी येथील विशाल फटे फसवणूक प्रकरण राज्यभर गाजले आहे. या आर्थिक घोटाळ्यात फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी माहिती देताना सांगितले की, हा आकडा कदाचित शंभर कोटींपर्यंत जाऊ शकतो. पोलिसांची तज्ज्ञ टीम तपास करत आहे.
आतापर्यंत 127 तक्रारी आल्या आहेत. सद्यस्थितीत 24 कोटी 84 लाख 11 हजार 520 रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद झाली आहे.
जवळपास 800 तक्रारदार यामध्ये आहेत. या सर्व तक्रारी दाखल झाल्यास शंभर कोटी रुपयांपर्यंत फसवणुकीचा आकडा होऊ शकतो.
आतापर्यंत 24 कोटी 84 लाखांचा घोटाळा उघड
बार्शी येथे अनेक सर्वसामान्य नागरिकांना शेअर मार्केटच्या नावाखाली तसेच ज्यादा पैसे मिळवून देतो असे आश्वासन देऊन अनेकांना विशालका या कंपनीत पैसे गुंतवण्यास भाग पाडले.
बार्शी येथील अनेक सर्वसामान्य नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, विशाल फटे याने कोणताही परतावा न देता कोट्यवधी रुपये लाटले असून, फसवणूक झाली असल्याची बाब समोर येताच विशाल फटे हा फरार झाला होता.
त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना अटक होताच त्याने सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आत्मसमर्पण केले होते.
तर फसवणूक आकडा शंभर कोटींपर्यंत
सद्यस्थितीत 127 जणांनी बार्शी पोलीस ठाण्यात विशाल फटे विरोधात तक्रार नोंदवली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासानुसार 24 कोटी 84 लाख 11 हजार 520 रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये जवळपास 800 जणांना गंडवले आहे, ते सर्व तक्रारदार पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली तर फसवणुकीचा आकडा शंभर कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वर्तवली आहे.
विशाल फटेकडून जप्त केला मुद्देमाल
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने या आर्थिक घोटाळ्यात विशाल फटेचा तीन कोटींचा बंगला ताब्यात घेतला आहे.
म्हणजे या बंगल्याची खरेदी विक्री थांबवली आहे. त्याच्या पत्नीचे 5 लाख रुपयांचे सोने हस्तगत केले आहे.
तसेच बार्शी येथील एका ओपन प्लॉटची देखील खरेदी विक्री थांबवली आहे. विशाल फटेचे सर्व बँक खाते बंद करण्यात आले आहेत.
कागदपत्रे जप्त करून डिसेंबर 2020 पर्यंत सर्व लेखाजोखा असलेल्या फायली जप्त केल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज