टीम मंगळवेढा टाईम्स ।
बार्शीसह राज्यभरातील शेकडो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेला विशाल फटे अखेर सोमवारी रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाला.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसआयटीची घोषणा केलेली असताना फटे स्वतःहून पोलिसांना शरण आला. कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या फटेला सुरुवातीला कोणीही ओळखले नाही,
त्यामुळे त्याने मी विशाल फटे अशी स्वतःहूनच ओळख करून दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
विशाल फटे याने राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. जसजशा तक्रार प्राप्त होत आहेत, तसतशी प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे.
आतापर्यंत सुमारे ५० तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून फसवणुकीचा आकडा १९ कोटीपर्यंत पोचला आहे. मात्र, अनेकांच्या तक्रारी अजून आलेल्या नाहीत. त्यामुळे आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, माध्यमांशी विविध क्षेत्रातून हे प्रकरण पुढे आल्यानंत विशाल फटे हा आज सकाळी प्रकट झाला. सोशल मीडियातून त्याने आपण पोलिसांपुढे हजर राहणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार तो सोमवारी रात्री उशिरा सोलापूर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यापुढे हजर झाला. त्याला अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बार्शी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या विशाल फटे याला शोधण्यासाठी व त्याने नेमके किती लोकांना फसविले आहे. याची चौकशी करण्यासाठी पोलिस अधीक्षक सातपुते यांनी ‘एसआयटी’ची स्थापना केली होती.
त्यानंतर सोमवारी फटे पोलिसांना शरण आला आहे. शेजारील कर्नाटकातून तो एसटी बसने सोलापुरात आला. सोलापूर बस स्थानकावरून तो रात्री आठच्या सुमारास रिक्षातून पोलिस अधीक्षक कार्यालयात पोचला.
पोलिस अधीक्षक कार्यालयात सुरुवातीला त्याला कोणीच ओळखले नाही. त्यामुळे शेवटी ‘मी विशाल फटे’ म्हणून त्याने स्वत:ची ओळख सांगितली आणि पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले.
रात्री उशिरापर्यंत त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरु होती. वैद्यकीय तपासणी करून त्याला उद्या सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी, तो इतके दिवस कुठे होता, तो फरार का झाला, याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सातपुते यांनी दिली.
फिर्यादी दिपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी त्याचे वडील व भावाला अटक केल्यानंतर तो पोलिसांना शरण आला. फरारी झाल्यानंतर तो बंगळुरु व कर्नाटकात वास्तव्यास होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.(स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज