टीम मंगळवेढा टाईम्स।
प्रत्येक निवडणुकीत गाजलेला मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी आता सोलापूर जिल्हा बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे यांचे चिरंजीव तथा मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे मैदानात उतरले आहेत.
या योजनेसाठी माझ्या पाठीमागे येण्यापेक्षा माझ्या बरोबरीने यावे. या पाणीप्रश्नावर आपण मोठे जनआंदोलन उभे करू, अशी भूमिका सिद्धेश्वर आवताडे यांनी मांडली.
मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील कार्यक्रमात सिद्धेश्वर आवताडे बोलत होते. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आखाड्यामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये सिद्धेश्वर आवताडे चर्चेत आले होते.
त्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी आपला जनसंपर्क पूर्वीपेक्षा अधिक पटीने वाढला आहे. त्यामुळे ते मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणामध्ये चर्चेत आहेत.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी (स्व.) आमदार भारत भालके यांनी 2009 पासून प्रयत्न केले. या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पण भाजपचे सरकार आल्यानंतर या योजनेत अडथळे आणले गेले. या योजनेसाठीचे पाणी व गावे कमी करण्यात आली.
पण, २०१९ मध्ये राज्यातील सत्ताबदलात आमदार भालके यांनी या योजनेतील पाणी व गावे कायम ठेवण्यात यश मिळवले होते. पण, त्यांच्या अकाली निधनामुळे या योजनेच्या कामात खंड पडला आहे.
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी या योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याचे सूतोवाच केले आहे.
पण, पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या पराभवानंतर तालुक्यातील राष्ट्रवादीत गटबाजी वाढली आहे. ही गटबाजी पाहता मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित प्रश्नासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा कोण करणार,असा प्रश्न निर्माण झाले आहे.
पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला विजय केल्यास या भागाच्या पाणीप्रश्नासाठी केंद्रातून निधी आणण्याची घोषणा प्रचार सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या योजनेवर बोलतील, अशी अपेक्षा मंगळवेढ्यातील जनतेला होती.
मात्र, त्याबाबत दोन्ही बाजूकडून हात घातला गेला नाही. त्यामुळे या योजनेला मुहूर्त कधी लागणार, याची चर्चा तालुक्यात सुरू असतानाच खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या नव्या भूमिकेमुळे तालुक्यात हा प्रश्न चर्चेला आला आहे.(स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज