टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथील एका शेतकर्याच्या 10 हजार रुपये किमतीचे बोकड चोरल्याप्रकरणी नाना जगताप, शुभम सावंत, संग्राम जाधव, व मोहन गांडुळे (सर्व रा.मंगळवेढा) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी हजारे (रा.घरनिकी) यांच्या राहते घराजवळून दि.8 नोव्हेंबर रोजी 10 हजार रुपये किमतीचे बोकड चोरीला गेल्याची फिर्याद पोलिसात दाखल होती.
एका सतर्क नागरिकामुळे या चोरीचा प्रकार उघड झाला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविताच बोकड चोरीची माहिती उघड झाल्याचे समजते.
तपासिक अंमलदार पोलिस नाईक कृष्णा जाधव यांनी वरील चौघा आरोपींना अटक केली असून आज न्यायालयात उभे केले जाणार आहे.
दरम्यान, या बोकड चोरीमुळे अनेकजणांच्या चोरीला गेलेल्या शेळया उघड होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
सांगोले बाजारात शेळया विकल्याच्या संशयावरून एका सतर्क नागरिकाने शेळया चोरीबाबत मुळाशी जावून चौकशी केली असता हे प्रकरण उघड झाल्याची दिवसभर मंगळवेढा शहरात चर्चा सुरु होती.
पोलिसांनी दिवसभरात एकेकाला ताब्यात घेवून खाक्या दाखविताच पोपटासारखे बोलू लागल्याने सर्व घटना समोर आल्याची चर्चा मंगळवेढा पोलिस स्टेशन आवारात ऐकावयास मिळत होती.
केवळ मौज मजेसाठी हा प्रकार घडल्याचेही चर्चेतून पुढे येत आहे. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात शेतकर्यांच्या अनेक शेळया चोरीस गेल्या आहेत.
मात्र पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल या भितीपोटी काहीजणांनी तक्रार देण्याचे टाळले असून आता ते लवकरच तक्रार देण्यास पुढे येत असल्याचे बोलले जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज