टीम मंगळवेढा टाईम्स।
धान्यासाठी दूरवरच्या रेशन दुकानाबाहेर तासन्तास थांबण्याची वेळ आता नागरिकांवर येणार नाही. राज्य शासनाने नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीवरील स्थगिती उठविल्याने आता जिल्ह्यात नवीन ५१ रेशन दुकाने होणार आहेत.
त्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती दिली होती.
ही स्थगिती उठवण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यात रेशन धान्य दुकानांची संख्या वाढणार आहे. पुरवठा विभागाने याची कार्यवाही सुरू केली आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ११ तालुक्यामध्ये नव्याने ५१ रेशन दुकाने होणार आहेत. त्यासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
बडतर्फ झालेले, निलंबित झालेले, शासनाने बंद केलेले, स्वतःहून काही दुकानदारांनी बंद केलेली अशी ५१ दुकाने नव्याने सुरू होणार आहेत.
एका रेशन दुकानाला २००० रेशन कार्डधारक असा नियम आहे. एकाच गावातील सर्व रेशन दुकानात त्यापेक्षा जास्त कार्डधारक असतील तर त्यांच्यासाठी नवीन रेशन दुकानाची सोय असणार आहे.
अनेक गावांमध्ये अजूनही रेशन धान्यदुकान नसल्याने तेथील नागरिकांना शेजारच्या गावात जाऊन धान्य आणावे लागते. त्यासाठी लांब जाणे , रांगेत थांबणे, धान्य नसेल तर परत फेरी मारणे, असा करावा लागणारा आटापिटा आता बंद होणार आहे.(स्रोत:दै.पुण्यनगरी)
१० हजार ७२६ मेट्रिक टन धान्याचे वाटप
सोलापूर जिल्ह्यात १५५८ दुकाने सुरू आहेत. या दुकानांसाठी एकूण १० हजार ७२६ मेट्रिक टन धान्याचे वाटप होत आहे.त्यामध्ये अंत्योदय योजनेतून १४२१ मेट्रिक टन गहू , ५६८ मेट्रिक टन तांदूळ , प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेतून ५ हजार २४२ मेट्रिक टन गह , ३४ ९ ५ मेट्रिक टन तांदळाचे जिल्ह्यातील गोरगरीब लोकांना वाटप होत आहे.
समिती घेईल निर्णय
सोलापूर जिल्ह्यात नवी ५१ रेशन दुकाने सुरू करण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासाठी ८ ९ प्रस्ताव आलेले आहेत.याप्राप्त प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे रेशन दुकानचे वाटप करण्याबाबतचा निर्णय जिल्हास्तरीय समिती घेईल.- मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी , सोलापूर
रिक्त पदांमुळे अडचणी
सोलापूर जिल्हा पुरवठा कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठी आहे ४२ पैकी १५ पदे रिक्त आहेत. त्यातच आता काही लोकांचे प्रमोशन होणार आहे. त्यामुळे आणखी जागा रिक्त होतील. कामे वेगाने पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. – वर्षा लांडगे , जिल्हा पुरवठा अधिकारी , सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज