टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात दररोज लस मिळत नसली तरी आठवड्यातून दोन दिवस मुबलक लस मिळत असल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे. ऑगस्टपूर्वी लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभर लस उपलब्ध होत असल्याने लसीकरण केंद्राबाहेर रांगा व गोंधळ नित्याचाच होता.
परंतु गेल्या काही दिवसांपासून लसपुरवठा वाढल्यामुळे प्रत्येक केंद्रावर आता १०० ते २०० लस उपलब्ध झाल्याने दुपारनंतर बहुतेक केंद्रावर गर्दीच नसते. या उलट लस शिल्लक राहिल्याचेही दिसून आले.
केंद्रामार्फत राज्य सरकारकडून यापूर्वी जिल्ह्यासाठी अवघ्या २० ते २५ हजार डोस एकावेळी उपलब्ध होत होते. परंतु, मागील चार दिवसांपासून दररोज पुरवठ्याचे प्रमाण १ ते २ लाखांवर झाले. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही पुरवठा वाढला.
आता लस उपलब्धतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. पण कोरोना अजूनही संपलेला नाही, नियमांचे पालन हाच कोरोनापासून सर्वश्रेष्ठ बचाव आहे असे प्रदीपकुमार भोसले यांनी सांगितले.
यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्याने लस दिली जात होती. यामुळे जेथे कँप आहे तेथे इतर गावातील नागरिक आले तर वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात लसीकरण होत होते. लसीकरण केंद्रावर लस मागणीच्या तुलनेत अत्यल्प पुरवठा होत असल्याने हाणामारीच्याही घटना घडल्या. आता लस पुरवठा होत असल्याने वाद व गोंधळ होत नाही.
शनिवारी मेगा लसीकरणसाठी ४ हजार लस उपलब्ध झाली. त्यामुळे पहिल्यादा सलग दोन दिवस लसीकरण सुरू आहे. हे चित्र जूननंतर प्रथमच दिसून आले. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर लस घेण्याचे आवाहन केले होते.
मात्र वेगाने लसीकरण होण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची गरज आहे. याकडे आ. समाधान आवताडे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
रोज पॉझिटिव्ह रुग्ण तरीही कोरोना नियंत्रणात
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत ९,६०० पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आहे. त्यामध्ये उपचार घेऊन ९,३६० बरे झाले. तर १९० मृत्यू झाले. १२ सप्टेंबरपर्यंत तालुक्यात ५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. लसीकरणाचा आकडा ४० हजार पार आहे.
ही आकडेवारी पाहता शहरासह तालुक्यातील ४० टक्के जनतेची प्रतिकारशक्ती वाढली आहे. आठवड्यातून ५ हजार लस उपलब्ध झाल्यास रुग्णसंख्या नियंत्रणात राहील, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज