टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील विद्यापीठे-महाविद्यालयांतील पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशांची प्रक्रिया बारावीच्या गुणांनुसारच राबवली जाणार आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) होणार नाही असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
यंदा बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनानुसार जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानंतर विद्यापीठे-महाविद्यालयांतील पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा विचार उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण विभागाकडून करण्यात येत होता.
त्यामुळे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे काय, सीईटी होणार का, असे प्रश्न निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कु लगुरूंसह बैठक झाल्यानंतर सामंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली.
सामंत म्हणाले, की पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रियेसाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यास आता पुरेसा अवधी नाही. त्यामुळे बारावीच्या गुणांनुसारच प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय कु लगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला.त्यामुळे महाविद्यालयांना आता प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल.
बारावीचा निकाल वाढल्यामुळे जागा कमी पडत असल्यास आवश्यकतेनुसार तुकडीवाढ करता येईल.त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचीही सूचना देण्यात आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वेळापत्रकानुसार नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे.
मात्र जिल्ह्यातील करोना संसर्ग स्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली जाईल. त्यामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती असल्यास त्यानुसार महाविद्यालयांबाबतचा निर्णय घेतला जाईल.
महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करताना विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करता येईल का, याचाही प्रयत्न आहे. शासन, सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) आणि विद्यापीठांचा आपत्कालीन निधी वापरून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा प्रयत्न असल्याचेही सामंत यांनी नमूद केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज