टीम मंगळवेढा टाईम्स ।
लग्नाचे आमिष दाखवून एका महिला पोलिसावर बार्शी रोड, अक्कलकोट रोड आणि तुळजापूर येथील लॉजवर नेऊन बलात्कार करण्यात आला. प्रेमसंबंधातून महिला पोलिस हिला दिवस गेल्यानंतर लग्नाआधी मूल नको म्हणून गर्भपात केला. त्यानंतर लग्नास नकार दिला. लग्नाचे आमिष देऊन बलात्कार केल्याप्रकरणी पीडित महिला पोलिसांनी फिर्याद दिली असून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या गार्डसह त्याची बहीण आणि भाऊजीवर
गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश अर्जुन पाखरे (रा. पेनूर, ता. मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलातील गार्डचे नाव आहे तसेच गणेश याची बहीण प्रियंका आणि भावजी उमेश राजगुरू यांच्यावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिला पोलिस नाईक या ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. 2018 मध्ये त्या गणपती विसर्जनाच्या ड्युटीवर होत्या. त्यावेळी कामती पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत अशोक शेंबडे (रा.पेनूर, ता.मोहोळ) यांची ओळख झाली.
एप्रिल 2019 मध्ये चंद्रकांत याने त्याचा मित्र गणेश पाखरे याची ओळख करून दिली. ओळखीनंतर गणेश याने त्याचा मोबाईल नंबर दिला तसेच पीडित महिला पोलिस नाईक यांचा मोबाईल नंबर घेतला. सुरूवातीच्या काळामध्ये गणेश आणि पीडिता यांची मैत्री झाली.
कालांतराने गणेश याच्याबरोबर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर गणेश याने महिला पोलिसास लग्नाचे आमिष दाखवून 1 जुलै 2020 ते 1 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत शहरातील खतीबनगर, अक्कलकोट रोड, मार्च व एप्रिल 2021 मध्ये तुळजापूर तालुक्यातील शिवनेरी लॉज, बार्शी रोडवरील दर्शन लॉज आणि सुप्रजा लॉज याठिकाणी नेऊन वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला.
त्यातून गर्भवती झाल्यानंतर लग्नाअगोदर मुल नको म्हणून आरोपी गणेश याची बहीण प्रियंका राजगुरू व तिचा पती उमेश राजगुरू यांनी जबरदस्तीने गर्भपात केला. पण त्यानंतर लग्न करण्याबाबत टाळाटाळ केली.
यामुळे पीडित महिला पोलिस नाईक हिने एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय मोरे हे करत आहेत.
संबंध अन् गर्भपातासाठी प्रेम तर लग्नासाठी मात्र टाळाटाळ
आरोपीच्या बलात्कार प्रकरणाने फिर्यादी महिला गर्भवती राहिली. यावेळी गणेश याची बहीण प्रियांका राजगुरू व तिचा पती उमेश राजगुरू यांनी तिला प्रेमाने समजावून लग्नाआधी मूल नको, तू गर्भपात करून घे, त्यानंतर लागलीच तुमचे लग्न लाऊन देतो, असे सांगून डफरीन चौकातील बनशंकरी हॉस्पिटल येथे गर्भपात केला.
गर्भपात झाल्यानंतर गणेश याने महिला पोलिसाचा फोन उचलण्याचे बंद केलेच पण तिला समजावणारे प्रियांका व उमेश यांनीही तिला प्रतिसाद दिला नाही.
सोलापुरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तर एका 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण
सोलापुरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तर एका 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. समाधाननगर, अक्कलकोट रोड येथे राहणार्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे 22 जून रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिचे अपहरण केले. अशा आशयाची फिर्याद त्या अल्पवयीन मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केली. यानुसार अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. .
तर लक्ष्मीनगरात राहणारा साकीब-हसन हा पहिलीत शिक्षण घेतो. सध्या शाळा बंद असल्याने तो घरीच असतो.
22 जून रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास साकीब-हसन व त्याची बहीण हे दोघे बिस्किट घेण्यासाठी गल्लीतील सय्यद किराणा दुकानात गेले. त्यानंतर त्याची बहीण एकटीच घरी आली. आईने साकीब-हसन कोठे आहे? असे विचारले असता तिने सांगितले की, साकीब हा घराजवळ आल्यावर मैदानाकडे खेळण्यास जातो म्हणून गेला आहे.
त्यानंतर 6 वर्षाच्या साकीब-हसन याचा त्याच्या आई-वडिलांनी शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे त्याचे अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केली. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पेटकर हे करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज