टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतमाल विक्री केलेल्या ज्या शेतकर्यांच्या मालाचे पैसे अडत दुकानदारांनी दिले नाहीत, अशा अडत्यांच्या दुकानाला कुलूप ठोकण्याच्या सक्त सूचना बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिल्या.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवक समितीची बैठक लोकनेते बाबुराव चाकोते येथील प्रशासकीय भवनात झाली. त्यावेळी सभापती यांनी संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या.
बाजार समितीमधील कांदा उत्पादक शेतकर्यांचे अडत दुकानदारांनी जवळपास 15 ते 20 लाख रुपये दिले नाहीत. या कांदा उत्पादक शेतकर्यांची पट्टी मिळावी, यासाठी संचालक आप्पासाहेब पाटील यांनीदेखील आवाज उठविला होता.
कांदा विक्री करूनही अनेक महिने लोटले तरी अडत दुकानदारांकडून पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे अशा अडत दुकानदारांचा परवाना रद्द करावा, अथवा दुकानाला कुलूप लावण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासनाला यावेळी सभापती, आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काही अडत दुकानदारांकडून शेतकर्यांना पैसे देताना नाहक त्रास दिला जात आहे. तुमच्या बँक खात्यावर जमा करतो, असे सांगून शेतकर्यांना पाठवून दिले जाते.
परंतु त्यानंतर शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात नाहीत. शेतकर्यांनी काही दिवसानंतर पैशाची मागणी केल्यानंतर बँक खाते क्रमांक चुकला आहे. पुन्हा सांगा, असे म्हणून पुन्हा दिवस ढकलले जात आहेत. याला शेतकरी आता वैतागले आहेत. लांबून शेतमाल घेऊन बाजार समितीत आलेल्या शेतकर्यांना असा विचित्र अनुभव येत आहे.
मात्र अशा प्रकारामुळे सोलापूर बाजार समितीचे नाव खराब होत असल्याने यापुढे अशा अडत्यांच्या दुकानांना थेट टाळे ठोकण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी बाजार समिती प्रशासनास दिल्या आहेत.
त्यामुळे आता पैसे बुडविणार्या अडत्यांचे धाबे दणाणले आहेत. या बैठकीत बाजार समितीच्या कर्मचार्यांना सातवा वेतन लागू करण्याबाबत येणार्या मासिक बैठकीत निर्णय घेतला जाईल. संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर तो ठराव जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
तसेच कर्मचार्यांच्या हक्काची रजा सरेंडर करण्यास मंजुरीबाबतचा निर्णयदेखील तेव्हाच घेण्यात येणार आहे. या बैठकीत संचालक बसवराज इटकळे, प्रकाश चोरेकर, शिवानंद पुजारी, सचिव चंद्रकांत बिराजदार आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज