टीम मंगळवेढा टाईम्स ।
दुधाची बोगस विक्री दाखवून जिल्हा दूध संघात 42 लाख 73 हजार 316 रुपयांचा अपहार करण्यात आला होता.
याप्रकरणी संघाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सतीश निंबराज मुळे (रा. भगवती टॉवर्स, दावत चौक, जुळे सोलापूर) व कालिका अमृत मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस्चे चालक बाळकृष्ण पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे सहाय्यक व्यवस्थापक विनायक शिवाजीराव कदम (वय 50, रा. भवानी पेठ, मराठा वस्ती) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. प्रशासकांकडून गैरकारभाराविरोधात हा मोठा दणका आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या 22 जुलै 2020 ते 4 ऑगस्ट 2020 रोजीपर्यंत मुरारजी पेठेतील जिल्हा दूध संघाच्या ऑफिसमध्ये तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे व कालिका अमृत मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस्चे प्रोप्रयटर बाळकृष्ण पवार या दोघांनी मिळून 42 लाख 73 हजार 316 रूपयांची दुधाची खोटी विक्री दाखवून अपहार केला.
यातून जिल्हा दूध संघाची फसवणूक करून संघाचे नुकसान केले. संघाच्या हिताची पूर्ण जबाबदारी मुळे यांच्यावर होती. असे असताना मुळे यांनी दूध संघाची फसवणूक केली व अपहाराची रक्कम स्वत:साठी वापरून संघाचे आर्थिक नुकसान केले.
मुळे यांनी 28 जुलै 2020 रोजी संचालक मंडळाच्या सभेमध्ये विषय क्रमांक 6 चा ठराव झालेला नसताना तो झालेला आहे, असे खोटे दाखवून बनावट रेकॉर्ड तयार केले. ते रेकॉर्डच पुरावा म्हणून खरा आहे, असा त्यांनी बनाव केला.
एकूणच या फिर्यादीवरून वरील दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बरडे हे करीत आहेत.
दरम्यान, जिल्हा दूध संघावर प्रशासकीय अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेेले श्रीनिवास पांढरे यांनी 17 मे रोजी मुळे यांच्यावर बडतर्फची कारवाई केली होती. आता पुन्हा मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज