टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके हे आमदार होण्यापूर्वीच ऊसाचं बिल मागणाऱ्या शेतकऱ्याला थेट तुरुंगात टाकलं ही कसली दादागिरी करत आहात असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन अरूण शिंदे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी, गोपाळपूर, अनवली, एकलासपूर, शिरगाव आदी भागात रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा घेण्यात आल्या. याप्रसंगी ते बोलत होते.
तुपकर पुढे बोलताना म्हणाले की, शेतकरी मारुती रामचंद्र पाटील तिसंगी गावचे असून त्यांनी विठ्ठल कारखान्याला 106 टन ऊस घातला होता. ऊस घालून तीन महिने झाले तरी या शेतकऱ्याला चेअरमन भगीरथ भालके यांनी एक रुपयाचे ही बिल दिले नाही.
जवळपास 2 लाख 12 हजार रुपयांचे बिल विठ्ठल कारखान्याकडे आहे. हक्काचे बिल मागण्यासाठी मारुती पाटील हे कारखाना स्थळावर उपोषणाला बसले असता कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी या शेतकऱ्यास तुरुंगात टाकलं आहे.
ही घटना आम्हाला समजतच आम्ही प्रचार थांबून शेतकऱ्यांसाठी थेट पोलीस टेशन गाठले. जोपर्यंत शेतकऱ्याला सोडणार नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून आम्ही जाणार नाही अशी ठाम भूमिका आम्ही घेतल्यानंतर पोलिसांनी मारुती पाटील यांना अखेर सोडून दिले.
शेतकऱ्यांचे पैसे लुबाडणारा भगीरथ भालके हा खुलेपणाने फिरत आहे. ज्या शेतकऱ्यांचे पैसे भालके यांच्या कारखान्याकडे आहेत उलट त्यांनाच पोलिसांचा धाक दाखवून तुम्ही तुरुंगात टाकत आहात. हा कसला तुमचा न्याय आहे.
भगीरथ भालके हे अजून आमदार व्हायचे आहेत आमदार व्हायच्या आधीच तुम्ही असली दादागिरी करत असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दुधासह शेतीमालासाठी आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी पाहिजे, मग मतासाठी का नाही? असाही सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केला.
सरकारने वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्याचे कनेक्शन कट केले, शेतकर् यांना दिलेली आश्वासनांने पाळली नाहीत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये केंद्र व राज्य सरकार बद्दल नाराजी आहे असेही तुपकर म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज