टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून आज स्वाभिमानी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
त्यामुळे स्वाभीमानी ची वेगळी चूल राष्ट्रवादी ला चटके देणार ठरू शकते. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
आज पहिल्याच दिवशी स्वाभिमानी चे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादी साठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडी धर्म पाळून राष्ट्रवादी ला मदत केली होती.
मात्र आता शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीच्या विरोधात पावले टाकायला सुरुवात केली आहे.
रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी सुद्धा स्वाभिमानी ने निदर्शने करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. आता तर थेट विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी उतरत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस साठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
दरम्यान या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांच्याशी संपर्क साधला त्यांनी पोटनिवडणुक स्वाभिमानी लढवत असल्याचे सांगितले . महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे स्वाभिमानी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याचे बागल म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज