टीम मंगळवेढा टाईम्स ।
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर यात्रेत भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात.
महाशिवरात्रीपासून सुरू होत असलेल्या या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम, कुस्ती स्पर्धेचे नेटके आयोजन केले जाते. परंतु, या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने या वर्षी महाशिवरात्री यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती यात्रा समितीने दिली.
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भीमा नदीच्या पात्रालगत प्राचीन असे हेमाडपंती श्री सिद्धेश्वराचे मंदिर आहे. आजूबाजूच्या परिसरातील निसर्गरम्य देखणे स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धेश्वरची यात्रा महाशिवरात्रीच्या दिवशी भरत असून लाखो भाविकांची दर्शनासाठी रीघ लागत असते.
परंतु या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासन स्तरावरून यात्रा, उरूस आदी उत्सवांना बंदी घालण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर होणारी 11 ते 15 मार्चदरम्यान माचणूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे.
याबाबत प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांची यात्रा कमिटीच्या सदस्यांसोबत बैठक झाली.
त्या वेळी माचणूर येथील महाशिवरात्री यात्रा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच यात्रा कमिटी तर्फे हे निवेदन देण्यात आले. तरी या यात्रा कालावधीत कोणीही नागरिकांनी देवस्थान ठिकाणी जाणार नाही.
तसेच जिल्ह्यातील व परराज्यातील भाविकांनी याची नोंद घेऊन यात्रेसाठी येऊ नये व दक्षता घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज