टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा आता सुरु झाला असून 45 वर्षांवरील को-मॉर्बिड रुग्णांना लस टोचली जात आहे.
यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली असून त्याठिकाणी अडीचशे रुपये भरून लस टोचावी लागणार आहे.
परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, करमाळा, अक्कलकोट आणि सांगोला या तालुक्यांत जनआरोग्य योजनेतील एकही दवाखाना नसल्याने त्याठिकाणी शासकीय रुग्णालयांमधूनच सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे.
मंगळेवढ्यातील महिला हॉस्पिटल,दामाजी हॉस्पिटल,सोलापूर शहर-जिल्ह्यातील अश्विनी सहकारी रुग्णालय, अश्विनी कुंभारी ग्रामीण रुग्णालय, मार्कंडेय, यशोधरा, सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल, बार्शीतील सुश्रूत हॉस्पिटल, सुविधा आयसीयु, (कॅटलॅब), जगदाळे मामा, अकलूजमधील क्रिटीकेअर व कदम हॉस्पिटल, पंढरपूरमधील लाईफलाईन व गॅलक्सी हॉस्पिटल यांनी प्रत्येकी 15 हजार रुपये भरले आहेत.
त्यामुळे या रुग्णालयांमध्ये आता नागरिकांना लस टोचून घेता येणार असल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील 43 रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत. या रुग्णालयांना शंभर रुग्णांसाठी 15 हजार रुपये भरावे लागणार असून त्यानंतरच त्यांना लसीकरणाची परवानगी दिली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
लस टोचून घेणे हे ऐच्छिक आहे, परंतु कोरोना होऊ नये म्हणून सर्वांनी लस टोचायलाच हवी असे आवाहनही डॉ. पिंपळे यांनी केले.
पहिला डोस घेतल्यानंतर संबंधितांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार असून तत्पूर्वी त्यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे असेही ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच लसीकरण करता येणार आहे.
खासगी रुग्णालयांनी शंभरजणांचे 15 हजार रुपये भरल्यानंतरच त्या रुग्णालयास लसीकरणाची परवानगी दिली जाणार आहे
आतापर्यंत सोलापूर, बार्शी, पंढरपूर, अकलूज, मंगळवेढ्यातील 13 रुग्णालयांमध्ये लसीकरण
सुरु झाले आहे.
उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्यांतील नागरिकांसाठी शहरातील रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज