टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी स्वछता व उत्साहवर्धक वातावरणात कोविशिल्ड लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. लसीकरण मोहिमेसाठी एकूण 953 डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी ग्रामीण रुग्णालयात एकूण 520 लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील आज पहिल्या दिवशी एकूण 100 जणांना लस देण्यात आली आहे.
यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे, गटविकास अधिकारी सौ.सुप्रिया चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.पद्माकर आहिरे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ.सुमित्रा तांबारे, समन्वयक शोभा माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी लसीकरण प्रतीक्षा कक्ष, तपासणी, लस देणे, ऑनलाइन नोंदणी करणे तसेच लस देऊन त्यांना दिलेल्या क्रमांकावर अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवून कोणता त्रास नाही झाला तर घरी जाऊ देण्यात आले.
अचानक कोणता त्रास होत असेल तर वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात येऊन त्यासाठी ऍम्ब्युलन्स सेवा तयार ठेवण्यात आली होती. यावेळी लस घेतलेल्या अनेक जणांना कोणताही त्रास जाणवल्याचे दिसले नाही.
या लसीकरण मोहिमेने सर्वसामान्य नागरिकांचा तणाव मात्र थोडासा निवळण्यास मदत होणार आहे, हे निश्चित आहे.
लसीकरणाचा प्रारंभ करताना पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते म्हणाल्या की, आरोग्य कर्मचाऱ्यांचे धैर्याचे कौतुक करावे तेवढे कमीच असून, त्यांनी कोरोना काळात आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत, दिवसरात्र काम करून कोरोनाला थोपविण्याचे काम केले असल्याने, आजचे सुवर्णक्षण अनुभवता आले.
कोरोना काळात अनेक वाईट अनुभव लोकांना आले. नागरिक मोठ्या दहशतीत वावरले.अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तीला गमवावे लागले तरी आलेल्या संकटाला मोठ्या धैर्याने तोंड देत शासनाच्या सर्व विभागांनी दिवसरात्र मेहनत करून कोरोनाच सामना केला.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम तर वाखाणण्याजोगे होते. त्यांनी तेव्हाच भीती दूर करून राष्ट्रीय कर्तव्यास सामाजिक जबाबदारीची जोड देऊन निरंतर कष्ट घेतले. आजची आलेली लस ही मोठी दिलासादायक बाब असून, तणाव कमी करणारी आहे.
नुसती ही लस घेतल्याने भागणार नाही तर आणखी एक लस 28 दिवसांनी घ्यावी लागेल आणि मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवणे ही पथ्ये पाळावीच लागतील. याशिवाय पूर्ण सुरक्षितता मिळणार नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज