सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 28 ग्रामपंचायतींवर सरपंचपदाचे तालुकानिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. आता तहसिलदारस्तरावरून गावनिहाय आरक्षण काढले जाणार आहे.
आरक्षण काढताना सर्वच चिठ्ठ्या समान आकाराच्या असाव्यात, 16 डिसेंबरला 11 वाजता तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी करावे.
कोणत्याही प्रवर्गातील आरक्षण निश्चित करताना लगतच्या निवडणुकीतील आरक्षण ध्यानात घेऊन आळीपाळीने आरक्षण द्यावे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश दिले आहेत.
यावेळी आमदार, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्यांना निमंत्रित करावे. तसेच सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यांनाही निमंत्रित करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मात्र, त्यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने सर्वोतोपरी खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीचे तालुकानिहाय अन् सरपंच आरक्षण
मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला व पुरुषांना, 11 महिलांना व 10 पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून संधी मिळेल. तर प्रत्येकी 24 महिला व 24 पुरुषांना सर्वसाधारण प्रवर्गातून संधी मिळणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी दहा ग्रामपंचायतींवर महिला व पुरुषांना संधी मिळणार असून दोन महिला व एका पुरुषास अनुसूचित जमातीतून सरपंच होता येणार आहे. 12 महिलांना व 13 पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंचपदाची संधी मिळेल. तर प्रत्येकी 23 महिला व पुरुषांना सर्वसाधारण प्रवर्गातून संधी मिळेल.
सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला तर सात ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल. एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीतील पुरुषाला, 11 ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला तर 10 पुरुषांनाही संधी मिळणार आहे. तर 19 ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातील महिला तर 20 ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळणार आहे.
करमाळा तालुक्यातील 105 ग्रामपंचातींपैकी 11 ग्रामपंचायतींवर पाच महिला व सहा अुनसूचित जातीचे आरक्षण पडले आहे. तर एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीच्या महिलेला संधी मिळणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातून 28 ग्रामपंचायतींपैकी 14 ग्रामपंचायतींवर महिला तर 14 ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल. 65 ग्रामपंचायतींवर सर्वसाधारणचे आरक्षण असून त्यात 33 महिलांचा समावेश आहे.
माढा तालुक्यातील 108 ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिलांना तर सात ग्रामपंचायतींवर याच प्रवर्गातील पुरुषांना संधी मिळेल. एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीचा पुरुष, 14 ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांना तर 15 ग्रामपंचायतींवर याच प्रवर्गातील पुरुषांना संधी मिळेल. सर्वसाधारण गटातून प्रत्येकी 32 महिला व पुरुषांना संधी मिळणार आहे.
बार्शी तालुक्यातील 129 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला तर सहा पुरुषांना संधी मिळणार आहे. तसेच अनुसूचित जमातीतील एका महिलेस संधी मिळणार आहे. 35 ग्रामपंचायतींवर 18 महिला व 17 पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. तर 82 ग्रामपंचायतींपैकी सर्वसाधारण गटातील 41 ठिकाणी महिला तर 41 पुरुषांना संधी मिळेल.
उत्तर सोलापूर तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील तीन महिला व तीन पुरुषांना तर अनुसूचित जमातीतील एका पुरुषाला संधी मिळणार आहे. पाच महिला व पाच पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंच होण्याची संधी मिळेल. तर 10 महिला व नऊ पुरुषांना सर्वसाधारण गटातून सरपंचपदाची संधी मिळणार आहे.
मोहोळ 94 ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिलांना तर सहा ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल. एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीतील पुरुषाला, 13 महिला व 12 पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंचपद मिळेल. 55 पैकी 27 ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण गटातून महिलांना तर 28 ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल.
दक्षिण सोलापुरात 83 ग्रामपंचातींपैकी प्रत्येकी सहा ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला व पुरुषांना तर प्रत्येकी दोन महिला व पुरुषांना अनुसूचित जमातीतून सरपंच होता येणार आहे. 11 ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्गातून महिलांना तर 12 पुरुषांना संधी मिळेल. सर्वसाधारण गटातून प्रत्येकी 22 महिला व पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळेल.
अक्कलकोट येथील 117 ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतून महिलांना तर सात पुरुषांना संधी मिळेल. दोन महिला व एका पुरुषास अनुसूचित जमातीतून आणि प्रत्येकी 16 महिला व पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंच होता येणार आहे. 34 ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातून महिलांना तर 33 पुरुषांना याच प्रवर्गातून सरंपचपद मिळविता येणार आहे.
माळशिरस तालुक्यातील 107 पैकी प्रत्येकी 15 ग्रामपंचायतींवर महिला व पुरुषांना समान संधी मिळणार असून एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीतील महिलेस तर 14 महिलांना व 15 पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंच होता येणार आहे. तर 23 महिलांना व 24 पुरुषांना सर्वसाधारण गटातून सरंपचपदाची संधी मिळणार आहे.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज