डाळिंब व्यापाऱ्याने पाठवलेले दोन ट्रकमधील 38 लाख रुपयांचे 33 टन डाळिंब परराज्यातील व्यापाऱ्याला सांगितलेल्या ठिकाणी पोच न केल्याने सांगोल्यातील डाळिंब व्यापाऱ्याची 39 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झाली.
याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.डाळिंब व्यापारी प्रताप श्यामराव येलपले (रा. अजनाळे, ता. सांगोला) हे शेतकऱ्यांकडून डाळिंब खरेदी करून व्यापाऱ्यांना पोच करण्याचे काम करतात. त्यांच्या मार्केटिंग केंद्रावर अब्दुलकरीम सलीम शेख (रा. उगाव, ता. निफाड, जि. नाशिक) हा मॅनेजर म्हणून कामास आहे.
मॅनेजर अब्दुल करीम शेख यास त्याच्या गावाकडील वाहन मालक शैला नामदेव पानगव्हाणे यांचा मुलगा वैष्णवी ऊर्फ बबलू याने फोन करून, आमच्या वाहनांना सांगोल्याहून भाडे मिळवून द्या, तसेच माझ्या वडिलांचा मित्र नवलकिशोर सिंग यांचा ट्रक तुमच्याकडेच भाड्याने लावत असल्याचे सांगितले.
त्यानुसार प्रताप येलपले यांच्या केंद्रावर एमएम 15/ईजी 97 14 या ट्रकवर वाहनचालक मारुती ढोली (रा. जेलरोड, नाशिक) व डब्ल्यूबी 23/डी 3714 या दुसऱ्या ट्रकवर अर्जुन पासवान वाहनचालक होता. 7 नोव्हेंबर रोजी दोन्ही ट्रकमध्ये कोलकता व गोजाडांगा येथील व्यापारी एंटरप्राइजेस व मछवा मार्केट फलमंडी येथील व्यापारी एम. के. एल. मोहम्मद कामिल यांना हे डाळिंब पोच करण्यास सांगितले होते.
दोन्ही ट्रकमध्ये प्रत्येकी 19 लाख रुपये किमतीचे साडेसोळा टन डाळिंब भरून पाठवण्यात आले.ट्रक पाठवताना दोन्ही वाहनचालकांना प्रत्येकी 22 हजार रुपयांचे डिझेल भरून खर्चापोटी प्रत्येकी 19 हजार 500 रुपये रोख रक्कम व दोन्ही वाहनचालकांच्या खात्यात प्रत्येकी 28 हजार 500 रुपये भरले होते.
दोन्ही वाहने कोलकता येथे 10 डिसेंबर रोजी सकाळी पोचणे अपेक्षित होते. वाहने वेळेवर न पोचल्याने दोन्ही वाहनचालकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोघांचेही मोबाईल बंद असल्याने संपर्क झाला नाही.
या वेळी प्रताप येलपले यांनी वाहन मालकाचा मुलगा वैष्णवी ऊर्फ बबलू पानगव्हाणे यांना मोबाईलवर विचारपूस केली असता त्यांचे वडील नामदेव पानगव्हाणे यांनी, आमच्या खात्यात 22 लाख रुपये जमा करा, तुमचा माल मी पुढे पाठवतो. जर तुम्ही पैसे न दिल्यास तुमचा माल मी दुसऱ्यास विकून टाकतो, असे सांगितले.
वाहनमालकाचा मुलगा व त्याचे वडील, दोन्ही वाहनांचे चालक यांनी संगनमत करून 39 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रताप येलपले यांनी वाहनचालकाचा पती नामदेव पानगव्हाणे, त्यांचा मुलगा वैष्णवी ऊर्फ बबलू पानगव्हाणे, वाहन चालक मारुती ढोली व अर्जुन पासवान यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज