खुनी हल्ला करून जखमी केल्याबद्दल दवाखान्यातील खर्च व झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल या खुनी हल्ला प्रकरणातील जखमी राजकुमार कुंभार, महादेव कुंभार व सुधाकर कुंभार यांनी आरोपी राजकुमार रुद्रप्पा गावडे (रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा) याच्यासह सातजणांविरुद्ध पंढरपूरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात २१ लाख ९७ हजार ६१७ रुपये इतकी नुकसान भरपाई मिळण्याबद्दलचा दावा दाखल केला आहे. अशा प्रकारचा दावा दाखल होण्याची पंढरपूर न्यायालयातील ही पहिलीच घटना आहे.
मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे शेतजमिनीच्या वादातून १० डिसेंबर २०१७ रोजी राजकुमार गावडे, कुमार गावडे, संजय कुमार गावडे, रवींद्रकुमार गावडे, गुंडाप्पा उर्फ बंडू आप्पा गावडे, वासुदेव गावडे व रुद्रप्पा गावडे यांनी सकाळी नऊच्या सुमारास राजकुमार कुंभार, महादेव कुंभार व सुधाकर कुंभार यांच्यावर तलवार, काठी, कुऱ्हाड अशा घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. यात तिघेही गंभीर जखमी झाले होते.
एवढेच नव्हे तर त्यांच्या वाहनांना आगी लावून मोठे नुकसान केले होते. गंभीर जखमींना त्वरित सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले व तज्ज्ञ डॉक्टरच्या उपचारामुळे या तिघांचे सुदैवाने प्राण वाचले. त्यानंतरही या तिघांनी सांगली येथील दवाखान्यात देखील उपचार घेतले. या उपचारासाठी त्यांना प्रचंड खर्च करावा लागला.
दवाखान्यातील औषधोपचाराचा खर्च, झालेला शारीरिक त्रास व मानसिक मनःस्ताप या सर्व बाबींसाठी राजकुमार कुंभार, महादेव कुंभार व सुधाकर कुंभार यांनी सर्व आरोपींविरूद्ध २१ लाख ९७ हजार ६१७ रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंढरपूरचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दावा दाखल केलेला आहे.
अशा प्रकारचा दावा दाखल होण्याची पंढरपूर न्यायालयातील पहिलीच घटना आहे.
याप्रकरणी वादी जखमी राजकुमार कुंभार, महादेव कुंभार, सुधाकर कुंभार यांच्यातर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. सिद्धेश्वर खंडागळे,ॲड. मनोज मिसाळ, ॲड. विकास मोटे तर प्रतिवादी आरोपीतर्फे ॲड. एस.टी.लवटे हे काम पाहात आहेत.
या खटल्याची पुढील सुनावणी दि.२९ डिसेंबर २०२० रोजी ठेवण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध फौजदारी खटलादेखील पंढरपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज