टीम मंगळवेढा टाईम्स।
किणी (ता. हातकणंगले) येथील मे. सम्राट फुडस रेस्टॉरंटवरील कारवाई थांबविण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती धनाजी देशमुख (रा. विश्व रेसिडेन्सी, फ्लॅट नं. २०२, ताराबाई पार्क कोल्हापूर, मूळ पत्ता_रा. समर्थनगर, मोहोळ, ता. जि. सोलापूर) शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडली.
पथकाने केलेल्या देशमुख हिच्या घराच्या झडतीत ८० तोळे सोने, साडेतीन लाखांची रोख रक्कम आणि डायमंडचा हार, चारचाकी गाडी जप्त केली. देशमुखयांना आज शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ती देशमुख अन्न सुरक्षा अधिकारी आहे. तिच्याकडे हातकणंगले विभागाची जबाबदारी आहे.
१५ मार्चला देशमुख हिने रेस्टॉरंटची तपासणी करून अन्न पदार्थांचे नमुने घेतले आणि तक्रारदार यांना कोणतीही कारवाई न करण्यासाठी १ लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदारांनी तडजोडीअंती ७० हजार रुपये देण्याचे ठरले. पैकी पहिला हप्ता २५ हजार रुपये देण्याचे ठरले. हा हप्ता तिने
राहत्या घराच्या पार्किंगमध्ये देण्याचे सांगितले. त्यावेळी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथक नेमण्यात आले. तक्रारदार रोख रक्कम घेऊन देशमुख हिच्याकडे गेले. ती देत असताना पथकाने तिला रंगेहाथ पकडले.
अचानक झालेल्या प्रकाराने ती घाबरून गेली. मी लाच घेतलेली नाही, असा पवित्रा तिने घेतला. अखेर रंगेहाथ सापडल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत पोलिस अंमलदार बंबरगेकर, सहायक फौजदार भंडारे, पोलिस हवालदार सुधीर पाटील, पूनम पाटील यांनी सहभाग घेतला.
मोहोळमधील घर सील
मोहोळः कोल्हापूर येथे लाच स्वीकारताना पकडलेल्या कीर्ती धनाजी देशमुख यांच्या मोहोळमधील समर्थ नगर येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत घर सील केले. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत काय सापडले हे मात्र सांगण्यास नकार दिला.
अबब… घरात ८० तोळे सोने
पथकाने देशमुख हिच्या ताराबाई पार्कातील विश्व रेसिडेन्सी, फ्लॅट नं. २०२ मधील घराची झडती घेतली. त्यावेळी ८० तोळे सोने, साडेतीन लाखांची रोख रक्कम आणि डामयंडचा हार सापडला. चारचाकी वाहन आणि फ्लॅटची किंमतही लाखांत आहे. डायमंडचा हारही सुमारे चार लाख रुपये किमतीचा आहे.
या सर्वांची मिळून एकूण रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात होते. इतकी मोठी रक्कम सापडल्याने पथकातील कर्मचारी आश्चर्यचकित झाले. इतकी रक्कम कोठून आली, त्याची माहितीही आयकर विभागाला देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज