टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात चार हजारांवर अंगणवाड्या असून सध्या सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे सर्वच अंगणवाड्या कुलूपबंद आहेत. त्यातील दीडशे ते दोनशे अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पोषण आहार दिला जात आहे. दुसरीकडे त्या मुलांना दररोज एक तास जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांकडूनच धडे दिले जात आहेत.
अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचा ३ डिसेंबरपासून बेमुदत संप सुरू आहे. त्यावर अजूनही शासन स्तरावरून मार्ग निघालेला नाही. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील सर्वच अंगणवाड्या २४ दिवसांपासून बंद आहेत.
वास्तविक पाहता अंगणवाड्यांमधील लहान बालकांना दररोज पोषण आहार देणे बंधनकारक आहे. मात्र, ना पोषण आहार ना अध्यापन, अशी वस्तुस्थिती आहे. एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या आदेशानुसार
सध्या अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना पोषण आहार देण्याची पर्यायी उपाययोजना करावी, त्यांना शिकविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची मदत घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.
आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत असाच पर्यायी मार्ग अवलंबला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पोषण आहाराच्या माध्यमातून अंगणवाड्यांमधील मुलांना पोषण आहार दिला जात आहे.
पण, अजूनही जिल्ह्यातील साडेतीन हजारांहून अधिक अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना आहार मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. पोषण आहार शिजवून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना प्रतिविद्यार्थी ६५ पैसे दिले जाणार आहेत.
चाव्या द्याव्याच लागतील, ती शासकीय मालमत्ता
■ अंगणवाड्यांच्या चाव्या देणार नाही, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. पण, अंगणवाड्यांच्या चाव्या या वैयक्तिक नव्हे तर शासकीय मालमत्ता आहे.
त्यामुळे चाव्या न दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होवू शकते असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे. पोषण आहार काढून जिल्हा परिषद शाळांना देण्यासाठी चाव्या गरजेच्या आहेत.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बेमुदत कामबंद आंदोलन मागे घ्यावे, अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी, मागण्यासंदर्भात शासन स्तरावरून मार्ग निघेल, असे आवाहन सर्वांनाच केले जात आहे. प्रसाद मिरकले, महिला बालविकास अधिकारी, सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज